
रत्नागिरी चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास प्रथम तिवरे धरण भरून वाहू लागलं. त्यानंतर धरणाला भगदाड पडत असल्याचे लक्षात आल्याने स्थानिक तलाठ्यांनी गावकऱ्यांना खबरदारीचा इशारा दिला. त्यानंतर तासाभरातच धरण फुटून धरणाखाली येणाऱ्या गावांमध्ये पाणी घुसले आणि हाहाकार उडाला.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील किमान सात गावे पाण्याखाली गेली आहेत. या घटनेने परिसरात हाहाकार माजला असून किमान २३ ग्रामस्थ वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे यासह सात गावांमध्ये पाणी घुसले आहे. यात किमान १९ ग्रामस्थ वाहून गेल्याची भीती आहे, अशी माहिती रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली.
पोलीस अधीक्षक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. जिल्हाधिकारीही घटनास्थळी पोहचले असून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. पुणे तसेच सिंधुदुर्गातून एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आल्याची माहितीही जिल्हा प्रशासनाने दिली.






