
टीम इंडियाने (Team India) इंग्लंडविरुद्ध (England) तिसऱ्या कसोटी सामन्यात 10 विकेटने दिमाखदार विजय मिळवला आहे. या विजयानंतर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप (World Test Championship) फायनलच्या अगदी जवळ पोहोचली आहे तर इंग्लंड टीमचे लॉर्ड्सच्या (Lords) मैदानावर फायनल खेळण्याचे स्वप्न भंग झाले आहे. इंग्लंड संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. दुसरीकडे, इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या पिंक-बॉल टेस्ट विजयानंतर टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान गाठले आहे. त्यामुळे, टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी संघाला आता चौथ्या सामन्यात देखील विजय मिळवणे गरजेचे आहे. भारतीय संघ इंग्लंडकडून चौथा कसोटी सामना हरला तर ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडसह (New Zealand) वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करेल.
सामना जिंकण्यासाठी इंग्लंडने (England) दिलेल्या 49 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात यजमान टीम इंडियाने (Team India) दणदणीत विजय मिळवला आहे आणि चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिलची सलामी जोडी नाबाद परतली. रोहित 25 धावा तर शुभमन 15 धावा करून नाबाद परतले. तिसऱ्या अहमदाबाद कसोटी (Ahmedabad Test) सामन्यातील विजयासह भारतीय संघाच्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहचण्याचा आशाही पल्लवित आहेत, तर इंग्लिश टीमचे आव्हान संपुष्टात आले आहेत. जो रूटच्या इंग्लंड संघाला टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी भारताविरुद्ध 3-1 असा विजय मिळवणे गरजेचे होते मात्र, यजमान संघाच्या आघाडीसह पाहुणा संघ आता चॅम्पियनशिप फायनलमध्ये प्रवेश करू शकणार नाही.
दरम्यान, टीम इंडियाने दुसऱ्या दिवशी 3 बाद 99 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली, पण पहिल्या सत्रात 145 धावांपर्यंतच मजल मारू शकली. रोहित शर्माने सर्वाधिक 66 धावा केल्या तर इंग्लिश कर्णधार रूटने 5 विकेट घेतल्या. जॅक लीचला 4 आणि जोफ्रा आर्चरला 1 विकेट मिळाली. यानंतर, दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या इंग्लंड फलंदाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच राहिली. अक्षर पटेलने इंग्लंड फलंदाजांना आपल्या फिरकीवर नाचवलं आणि सामन्यात पाहल्यांदा 10 पेक्षा अधिक विकेट घेण्याचा पराक्रम केला. अक्षरने अहमदाबाद सामन्यात एकूण 11 विकेट्स घेतल्या. विकेट शिवाय, अक्षरने आपल्या दुसऱ्याच कसोटी सामन्यात सलग तिसऱ्यांदा पाच विकेट घेतल्या. यापूर्वी, भारताचा पहिला डाव 53.2 ओव्हरमध्ये 145 धावांवर होता आणि इंग्लंडचा पहिला डाव 112 धावांवर संपुष्टात आल्याने भारताने पहिल्या डावात 33 धावांची आघाडी मिळाली होती.










