पायाभूत सुविधांना गती आणि कृषी क्षेत्राला बळकटी देणारा राज्याचा अर्थसंकल्प

वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आणि वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत राज्याचा सन 2021-22 चा अर्थसंकल्प सादर केला.

तीन लाख रुपये मर्यादेपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा करण्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली. तसेच आंतरराष्ट्रीय महिलादिनानिमित्ताने राज्यातील महिलांना शुभेच्छा देताना महिलांच्या घराच्या स्वप्नपुर्तीसाठी मुद्रांक शुल्कात एक टक्का कर सवलतीची विशेष योजना या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली आहे. 

अर्थव्यवस्थेला गती देणे व रोजगार निर्मितीकरीता मुलभूत बाबीवर खर्च करण्यासाठी 58 हजार 748 कोटी रुपये तरतूद करण्यात आली असून राजकोषीय तूट 66 हजार 641 कोटी रुपये असणार आहे. सन 2021-22 मध्ये जिल्हा वार्षिक योजनेसाठी 11 हजार 35 कोटी रुपये तरतूद उपलब्ध होणार आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम” योजनेचे उद्दिष्ट वाढवून यावर्षी 25 हजार उद्योग घटकांना मदत करण्याचे उद्दीष्ट.
एक जिल्हा एक उत्पादन योजनेअंतर्गत स्थानिक कारागिर , मजूर व कामगारांना कौशल्य वर्धनासाठी सहाय्य करून त्यांच्या उत्पादनांसाठी राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देणार
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व मुंबई-नाशिक महामार्गावर मेगा इलेक्ट्रीक व्हेइकल चार्जिंग सेंटर स्थापन करण्यात येणार.

हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 400 कोटी रुपये खर्चास मान्यता.

वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतूचे17 किलोमीटरचे 11 हजार 333 कोटी रूपये किंमतीचे काम सुरु. वांद्रे-वर्सोवा- विरार सागरी सेतू, किंमत 42 हजार कोटी रूपये .

जलसंपदा विभागास 12 हजार 951 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित.

आरोग्य संस्थांचे बांधकाम व श्रेणीवर्धनासाठी 7 हजार 500 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प येत्या चार वर्षांत पूर्ण करण्यात येईल.
महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये दर्जेदार आरोग्य सेवांसाठी येत्या 5 वर्षात 5 हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देणार, त्यापैकी 800 कोटी रुपये यावर्षी.
कर्करोगाच्या निदानासाठी राज्यात 150 रूग्णालयांमध्ये सुविधा.
सिंधुदूर्ग, उस्मानाबाद, नाशिक, रायगड आणि सातारा येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये. अमरावती व परभणी येथेही वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात येणार.

राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेअंतर्गत गृहखरेदीची नोंदणी कुटुंबातील महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक शुल्काच्या प्रचलित दरामध्ये सवलत.
ग्रामीण विद्यार्थिनींना गावापासून शाळेपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून देणारी राज्यव्यापी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजना, शासनाकडून राज्य परिवहन महामंडळास पर्यावरणपूरक दीड हजार सीएनजी व हायब्रीड बस उपलब्ध करून देणार.
मोठ्या शहरातील महिलांना प्रवासासाठी ‘तेजस्विनी’ योजनेत आणखी विशेष महिला बस उपलब्ध करुन देणार.

शाश्वत कृषी विकासासाठी

तीन लाख रुपये मर्यादेपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा
कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची योजना घोषित.
शेतकऱ्यांना कृषीपंप वीज जोडणी देण्याकरीता महावितरण कंपनीला दरवर्षी 1 हजार 500 कोटी रुपये निधी भागभांडवल.
थकीत वीजबिलात शेतकऱ्यांना 33 टक्के सूट, ऊर्वरित थकबाकीपैकी 50 टक्के रकमेचा भरणा मार्च 2022 पर्यंत केल्यास राहिलेल्या 50 टक्के रकमेची अतिरीक्त माफी, 44 लाख 37 हजार शेतकऱ्यांना मूळ थकबाकी रकमेच्या 66 टक्के, 30 हजार 411 कोटी रूपये रक्कम माफ.
शेतमालाच्या बाजारपेठ व मूल्यसाखळ्यांच्या निर्मितीसाठी एकूण 2 हजार 100 कोटी रुपये अंदाजित किंमतीचा मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प
प्रत्येक तालुक्यात किमान एक, याप्रमाणे सुमारे 500 नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका स्थापन करणार.
राज्यातील 4 कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी येत्या 3 वर्षात 600 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देणार.
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत लाभार्थींना गाय किंवा म्हशींचा पक्का गोठा बांधण्यासाठी, शेळीपालन किंवा कुक्कुटपालनाची शेड बांधण्यासाठी तसेच कंपोस्टींगकरता अनुदान.

मुंबईच्या विकासाचे प्रकल्प

सप्टेंबर 2022 मध्ये शिवडी – न्हावा शेवा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन. वरळी ते शिवडी उड्डाणपूलाचे काम सुरु,3 वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन.
40 हजार कोटी रूपये किंमतीच्या, 126 कि.मी. लांबीच्या, विरार ते अलिबाग “मल्टीमोडल कॉरिडॉर” च्या भूसंपादनाचे काम सुरु.
15 किलोमीटर लांबीचा “ठाणे कोस्टल रोड”, ची उभारणी सुरु, 1 हजार 250 कोटी रूपये खर्च अपेक्षित.
वसई ते कल्याण या जलमार्गावर वाहतूक सुरू करण्यात येणार.

राज्याचे वित्त आणि नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राज्याचा 2021-22 चा अर्थसंकल्प विधानपरिषदेत सादर केला. आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना शुभेच्छा देत राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करुन त्यांनी अर्थसंकल्प सादरीकरणास सुरुवात केली. सुमारे दिड तास चाललेल्या अर्थसंकल्प वाचनाद्वारे त्यांनी राज्याच्या सर्वांगिण विकासाचे चित्र सादर केले. संकटापुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि संकटकाळात कधी मागे हटला नाही. कोरोनाकाळातही सर्वांनी मिळून या संकटाचा सामना केला, असे ते म्हणाले.