महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी….. असं कोण म्हणतंय?

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे प्रत्युत्तर

निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून झालेल्या उचलबांगडीनंतर परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापू लागले आहेत. भाजपने आक्रमक पवित्रा घेत, गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपसह रिपाइं, वंचित बहुजन आघाडी आणि मनसेनेही या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.इतकंच नाही, तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणीही वारंवार केली जात आहे. तसेच, अनिल देशमुख यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्याही राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

सुधीर मुनगंटीवार-

सुधीर मुनगंटीवार राज्यपालांच्या भेटीला राज्यपाल महोदयांनी राज्य सरकार घटनेनुसार चालत नसेल तर त्याची माहिती राष्ट्रपतींना कळवणे गरजेचे आहे, अशी आमची मागणी आहे. आम्ही राज्यपाल यांना भेटणार आहोत. राज्यपालांनी राज्याची माहिती राष्ट्रपतींना कळवावी, अशी मागणी राज्यपालांकडे करणार आहोत, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.

प्रकाश आंबेडकर – 

मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी १०० कोटी कसे वसूल करायला सांगितले, हे स्पष्ट केलं आहे. हा आकडा आमच्या दृष्टीने कमी आहे. पण हे नेक्सस उभं राहिलेलं आहे. राज्यपालांनी आम्हाला वेळ दिली आहे. हे सरकार बरखास्त करा, अशी मागणी आम्ही करणार आहोत, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

रामदास आठवले – 

रामदास आठवले राज्यपालांना भेटणार महाराष्ट्रात कायदा सुवस्यवस्था बिघडली असल्याने, राज्यात राष्ट्रपती शासन लावण्याच्या मागणीचे पत्र अमित शाह यांच्याकडे देणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप गंभीर आहेत. त्यांनी तातडीने मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. अनिल देशमुखांवर झालेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे – 

केंद्राने हस्तक्षेप करण्याची राज ठाकरेंची मागणी परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र हे गंभीर आहेच. पण मूळ प्रश्न अंबानी यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवला कुणी? कुणाच्या आदेशाशिवाय एखाद्या पोलिसाकडून बॉम्ब ठेवण्याचे धाडस होणार नाही. केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करावा. केंद्रीय तपास संस्थांमार्फत या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. यानंतर फटाक्यांच्या माळा लागतील, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले.

संजय राऊत काय म्हणाले ?

शरद पवारांनी मात्र परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचं सांगत राजीनामा घेणार नसल्याचं आज (२२ मार्च) दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं.तर दुसरीकडे त्याचबरोबर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणीही पुढे आली आहे. या दोन्ही मुद्द्यांना उत्तर देताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्र्रात राष्ट्रपती राजवट लावण्याऐवजी केंद्र सरकारच बरखास्त केलं पाहिजे,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.