
केंद्र सरकारने लशीच्या दोन डोजमध्ये अंतर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या नव्या गाइडलाइन्सनुसार कोविशील्ड लशीच्या दोन डोजमध्ये आता ४ च्या ऐवजी ६ ते ८आठवड्यांचं अंतर असेल.
नॅशनल टेक्निकल अॅडवायजरी ग्रुप ऑन ईम्यूनायजेशन आणि नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन वॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशन फ़ॉर कोविड-१९ या बैठकीत घेतलेल्या निर्णयानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला तसे करण्याचा सल्ला देण्यात आला. या सल्ल्याचा विचार करत केंद्र सरकारने कोविशिल्ड लसीच्या पहिला डोस आणि दुसऱ्या डोसमधील अंतर ६ ते ८ आठवड्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत केंद्राने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.
कोविशिल्डचा दुसरा डोस ६ ते ८ आठवड्यांच्या दरम्यान दिल्यास अधिक लाभदायक फायदे होतील असा तज्ञांचा अहवाल आहे. या संदर्भात, आज केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी आतापासून कोविशिल्ड लसीच्या पहिल्या आणि दुसर्या डोसमधील अंतर किती असावे याचा उल्लेख केला आहे. सोबतच त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.






