
पुणे (Pune) येथे सुरु असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने (India) दिलेल्या 337 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने (England) 43.3 ओव्हरमध्ये 6 विकेटने शानदार विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) आणि बेन स्टोक्स (Ben Stokes) संघाच्या विजयाचे नायक ठरले. सलामी फलंदाज बेअरस्टो आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या स्टोक्सने शतकी खेळी करत निर्णायक सामन्यात संघाला विजयीरेष पार करून दिली. स्टोक्सने 99 धावा केल्या तर जेसन रॉयने 55 धावांची अर्धशतकी खेळी केली.
बेअरस्टोने 124 धावा केल्या. डेविड मलान (Dawid Malan) 16 धावा आणि लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone) 27 धावा करून नाबाद परतले. बेअरस्टो आणि स्टोक्समध्ये तिसऱ्या विकेटसाठी 175 धावांच्या मोठ्या भागीदारीने संघाचा विजय निश्चित केला. दुसरीकडे, तीनशे पार धावांची मोठी धावसंख्या उभारूनही संघ विजय मिळवू शकला नाही. प्रसिद्ध कृष्णाला 2, भुवनेश्वर कुमारला 1 विकेट मिळाली. तर रोहित शर्माने रॉयला धावबाद केलं.
टीम इंडियाने 6 विकेट गमावून पहिले फलंदाजी करत इंग्लंडसमोर 336 धावांचा डोंगर उभा केला. केएल राहुलचं शतक, कर्णधार विराट कोहली आणि रिषभ पंतच्या अर्धशतकांच्या जोरावर यजमान टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी तीनशे धावसंख्येचं तगडं आव्हान दिलं. अशास्थितीत, विशाल धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या इंग्लिश संघासाठी बेअरस्टो आणि रॉयच्या सलामी जोडीने पुन्हा एकदा शतकी भागीदारी करत दमदार सुरुवात केली. इंग्लंडकडून जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी 110 धावांची शतकी भागीदारी केली.
यादरम्यान, रोहितने शानदार क्षेत्ररक्षण करत संघाला पहिले यश मिळवून दिल. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात बेअरस्टो सोबतच्या गोंधळात रॉय धावबाद होऊन पॅव्हिलियनमध्ये परतला. स्टोक्स आणि बेअरस्टोच्या शतकी भागीदारीने संघाला विजयच्या जवळ नेले असताना भुवीने स्टोक्सला 99 धावांवर माघारी धाडलं.
यानंतर, निर्णायक क्षणी कृष्णाने एकाच ओव्हरमध्ये इंग्लंडला दोन झटके दिले. बेअरस्टोला कृष्णाने ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर झेल बाद केलं तर त्यानंतर चौथ्या चेंडूवर जोस बटलर शून्यावर क्लीन बोल्ड झाला. मात्र, तो पर्यंत यजमान संघाच्या हातून विजय निसटला होता.











