
राज्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. औरंगाबाद शहर आणि इतर तालुक्यांतसुद्धा कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोना प्रतिबंधक नियम लागू करण्यात आले असले तरी येथे कोरोनाला थोपवण्यात यश येत नाहीये. ही परिस्थिती पाहता येथील प्रशासनाने आता औरंगाबादेत लॉकडाऊन (lockdown in Aurangabad) लागू केला आहे. 30 मार्च ते येत्या 8 एप्रिलपर्यंत हा निर्णय लागू असेल. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
मागील काही दिवासांपासू राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. औरंगाबादेतही कोरोना रुग्णांमध्ये रोज मोठी वाढ होत आहे. येथे बाजारपेठ, तसेच इतर सामान खरेद करण्यासाठी लोकांची झुंबड उडत असल्यामुळे रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे. फक्त औरंगाबाद मनपा क्षेत्रात हजारो रुग्ण रोज आढळत आहेत. शुक्रवारी दिवसभरात 1500 पेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद केली गेली. ही परिस्थिती गंभीर असल्याचे मत अनेकांकडून व्यक्त होत होते. या पार्श्वभूमीवर आता येथील प्रशासनाने कडक पवित्रा धारण केला असून येथे थेट लॉकडाऊन जाहीर केला आहे. येत्या 30 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन लागू असेल. या काळात नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
दरम्यान, राज्य सरकारने कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. सरकारने नियम आणखी कडक केले असून नागरिकांनी नियमांच्या अधीन राहूनच सर्व कामे करावीत असे आवाहन केले आहे. नव्या गाईडलाईन्स नुसार राज्यात आजपासून रात्री 8 वाजल्यापासून ते पहाटे 7 वाजेपर्यंत जमावबंदी लागू असेल. तसेच चौपाट्या, उद्याने, मॉल, सिनेमागृह यासाठीही सरकारने अनेक निर्बंध घातले असून राज्यात सर्व प्रकारच्या कार्यक्रमांनाही बंदी घालण्यात आली आहे. येत्या 15 एप्रिलपर्यंत मिशन बिगीन अगेनचे हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.











