
तरुण वर्गामध्येही मोठय़ा प्रमाणावार कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे या वयोगटाला विषाणूपासून वाचवणे आवश्यक असून 25 वर्षापुढील सर्वाना कोविड प्रतिबंधात्मक लस द्यावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.
मध्यंतरी देशातील मुख्यमंत्र्यांसमवेतच्या एका व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये 45 वर्षापुढील सर्वांना लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी पंतप्रधानांनी मान्य केली होती. आजच्या या पत्रात मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी धन्यवाद देऊन लसीकरण वयोगट आणखी कमी करण्याची विनंती केली आहे. लसींचे वाढीव डोस महाराष्ट्राला मिळावेत असेही या पत्रात म्हटले आहे.
मोठय़ा संख्येने तरुण वर्ग विशेषतः जो घराबाहेर कामाला जातो त्याला लस मिळाल्यास रुग्ण संख्या कमी होण्यास मदत होईल असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे. पेंद्र सरकारच्या सहाय्याने आणि राज्य सरकारांच्या प्रयत्नाने या संसर्गाच्या लाटेवर मात करता येणे शक्य होईल असे सांगून मुख्यमंत्र्यांनी आधी जीवन, मग उपजीविका अशा प्राधान्याने आणि विज्ञानाच्या उपयोगाने देशाला एका नव्या सामान्य परिस्थितीत आणता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा गुरुवारी संध्याकाळी साडेसहा वाजता देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील, असे पंतप्रधान कार्यालयातून सांगण्यात आले. कोरोना लसीकरण मोहिमेबाबत या बैठकीत आढावा घेण्यात येईल.











