दक्षिण आफ्रिकेचा पाकिस्तानवर विजय, तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 बरोबरी

यजमान दक्षिण आफ्रिकेने दुसऱया एकदिवसीय क्रिकेट सामन्यात पाकिस्तानचा 17 धावांनी पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी महत्त्वपूर्ण बरोबरी साधली. आता मालिकेचा फैसला बुधवारी (दि. 7) होणार आहे. अवघ्या 7 धावांनी द्विशतक हुकलेला पाकिस्तानचा फखर जमान या सामन्याचा मानकरी ठरला.

दक्षिण आफ्रिकेकडून मिळालेल्या 342 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानला 9 बाद 324 धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. सलामीवीर फखर जमानने 155 चेंडूत 18 चौकार व 10 षटकारांच्या साह्याने 193 धावांची वादळी खेळी केली, पण त्याला आपल्या संघाला विजयापर्यंत नेता आले नाही. कर्णधार बाबर अझम (31) वगळता इतर एकाही फलंदाज फखरला साथ देऊ न शकल्याने पाकिस्तानचा पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेकडून ऍन्रीच नॉर्जेने 3, तर हॅण्डील फेहलुकयावोने 2 फलंदाज बाद केले. कॅगिसो रबाडा, लुंगी नगिडी व तबराईज शमसी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 6 बाद 341 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. यात क्विंटॉन डिकॉक (80), ऐडेन मार्करम (39) यांनी चांगली सलामी दिल्यानंतर कर्णधार तेम्बा बाऊमा (92), रेसी वान डेर डुसेन (60) व डेव्हिड मिलर (50) यांनी उपयुक्त फलंदाजी करीत दक्षिण आफ्रिकेला धावांचा डोंगर उभारून दिला. पाकिस्तानकडून हॅरिस रौफने 3, तर शाहिन शाह आफ्रिदी, मोहम्मद हसनिन व फहिम अश्रफ यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.