
सचिन वाझेला महिन्याला 100 कोटी रुपयांची खंडणी गोळा करण्याचे आदेश दिल्याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला असून ते तडक दिल्लीला रवाना झाले आहेत.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता.
या प्रकरणाची सीबीआय चौकशी होत असल्याने पदावर राहणं नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नसल्याचं अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे.
भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन गृहमंत्री (Home Minister) अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची विकेट पडली. त्यांना राजीनामा द्यावा लागला. आता या पदावर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातून दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांची निवड झाली. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे महाविकासआघाडी सरकारमध्ये उत्पादन शुल्क मंत्रालयाचा कार्यरभार होता. त्यांच्याकडे असलेला हा कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कामगार विभागाच अतिरीक्त कार्यभार हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवीण्यात आला.
दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक ज्येष्ठ नेते आहेत. पक्षात शरद पवार यांच्यानंतरच्या पहिल्या फळीतील जे काही मोजके नेते आहेत त्यांच्यात दिलीप वळसे पाटील यांचा समावेश होतो. ते शरद पवार यांच्या केवळ निकटवर्तीयातीलच नव्हे तर अत्यंत विश्वासूंपैकी एक आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी प्रदीर्घ काळ शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही काम केले आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या कामाची पद्धत आणि दिलीप वळसे पाटील यांची काम करण्याची क्षमता अशा दोन्ही गोष्टी एकमेकांना ज्ञात आहेत.
आपल्या एकूण राजकीय जीवनात दिलीप वळसे पाटील यांनी विविध मंत्रालयांचा कारभार सांभाळला आहे. या आधी आघाडी सरकारमध्ये त्यांनी महत्त्वाची मंत्रीपदे सांभाळली आहेत. यात वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ऊर्जा, उत्पादन शुल्क, कामगार विभागासारख्या मंत्रालयांचा समावेश होतो.
दिलीप वळसे पाटील हे बी. ए. (ऑनर्स), डी. जे., एल.एल.एम. आहेत. त्यामुळे त्यांना विधिमंडळ कामकाज आणि कायदेशीर प्रक्रिया आदी गोष्टींची खडानखडा माहिती आहे. संसदीय राजकारणाच्या आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्याची चुणूक वळसे पाटील यांनी अनेकदा दाखवून दिली आहे.






