मातोश्रीच्या अंगणात तृप्ती सावंत यांचा भाजप मध्ये प्रवेश

शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती बाळा सावंत यांनी आज असंख्य शिवसेना कार्यकर्त्यांसोबत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज (६ एप्रिल) भाजपा मध्ये प्रवेश केला.

या पक्षप्रवेशाने मातोश्रीच्या अंगणातच शिवसेनेला जबर धक्का बसला आहे असे मानले जात आहे. या पक्षप्रवेशावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, आमदार नितेश राणे, आमदार अतुल भातखळकर उपस्थित होते.

शिवसेनेने २०१९ सालच्या विधानसभेत तृप्ती सावंत यांचे तिकीट कापून तत्कालिन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला होता.

२०१५ साली मध्ये आमदार बाळा सावंत यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत शिवसेनेने तृप्ती सावंत यांना तिकीट दिले. त्यावेळी तृप्ती सावंत यांनी नारायण राणे यांच्याविरोधात बाजी मारुन विधानसभेत प्रवेश केला होता.