
प्रतिनिधी / मुंबई
भारतात कोरोना महा साथीच्या आजाराचे थैमान सुरू आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बाधितांचा आकडा वाढत असताना चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.
मे महिन्यात भारतात कोरोना ची लाट आणखी जोर पकडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असुन त्यामुळे दररोज पाच हजार कोरोनाबाधितांचा मृत्यू होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान भारतातील तीन लाख नागरिकांना करोनामुळे प्राण गमवावे लागण्याची शक्यता आहे.
वॉशिंग्टन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेटरिक्स अँड एवोल्यूशनच्यावतीने करण्यात आलेल्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. १५ एप्रिल रोजी प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, भारतात कोरोनाच्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण मोहिमेवर भर देण्यात येणार असल्याचे म्हटले. तरीही आगामी दिवसात स्थिती आणखी बिकट होणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली. या संशोधनासाठी भारतातील मृत्यू आणि संसर्गाच्या दराचा अभ्यास करण्यात आला. यावर्षी मे महिन्याच्या मध्यात भारतातील कोरोना बळींची संख्या ५६०० इतकी होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
१२ एप्रिल ते १ ऑगस्ट या काळात अतिरिक्त तीन लाख २९ हजार मृत्यू होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच दररोज बाधित आढळण्याचा दर मागील वर्षीच्या सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत या एप्रिल महिन्यात दुप्पट असल्याचे दिसून आले आहे.
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात नवीन बाधित आढळण्याच्या प्रमाणात ७१ टक्के वाढ दिसून आली. नियमांचे पालन न केल्यामुळे दररोज होणाऱ्या कोरोना मृत्यूंचे प्रमाण ५५ टक्के वाढले असल्याचे संशोधनात म्हटले आहे. या संशोधनानुसार, देशव्यापी लसीकरणामुळे जुलै महिन्याच्या अखेर ८५ हजार ६०० जणांचे प्राण वाचवले जाऊ शकतात असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.











