वाराणसीत ‘सपा’ने मारली बाजी

उत्तर प्रदेशात भाजपला उतरती कळा लागल्याचे चित्र आहे. पश्चिम बंगालपाठोपाठ उत्तर प्रदेशच्या जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपचा ‘सपा’टून पराभव झाला आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत झालेल्या मतमोजणीत मथुरा, लखनौबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात भाजपची पिछेहाट झाली. वाराणसीत भाजपने 7 जागा जिंकल्या, तर समाजवादी पक्षाने 15 जागांवर बाजी मारली.

जिल्हा पंचायत निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सायंकाळीही सुरू होती. पाच शहरांच्या जाहीर झालेल्या निकालात भाजप मागे पडून समाजवादी पार्टीने बाजी मारल्याचे चित्र स्पष्ट झाले होते. मोदींच्या वाराणसीत 40 पैकी 39 जागांची मतमोजणी सुरू आहे. एका उमेदवाराचा मृत्यू झाल्यामुळे तेथील निवडणूक स्थगित केली होती. मंगळवारी सायंकाळपर्यंत 26 जागांचा निकाल जाहीर झाला. त्यात भाजपला केवळ 7 जागा जिंकता आल्या.

दुसरीकडे, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या लखनौ मतदारसंघात ’सपा’ने 10 तर भाजपने अवघ्या 3 जागा जिंकल्या. मथुरेत मायावतींच्या बसपाने भाजपचे पानिपत केले. 33 जागांपैकी 13 जागांवर बसपाने विजय मिळवला, तर भाजपचे केवळ 7 उमेदवार जिंकले.

अयोध्यानगरीतही भाजपचा दारूण पराभव झाला. येथे भाजपने केवळ 6 तर सपाने 24 जागा जिंकल्या. मुख्यामंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर मतदारसंघात भाजपपेक्षा अपक्ष उमेदवारांनी अधिक जागांवर बाजी मारली. सर्वाधिक 21 जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले.