ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेमध्ये Zakir Hussain Hospital मधील मृतांचा आकडा 22 वर

महाराष्ट्रात कोविड 19 च्या रूग्णांना एकीकडे वेळेत ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर मिळत नसल्याने उपचाराअभावी रूग्ण दगावत असल्याचं चित्र असताना आता नाशिकच्या झाकीर हुसेन हॉस्पिटल (Zakir Hussain Hospital) मध्ये ऑक्सिजन प्लांट मध्ये गळती झाल्याचं वृत्त काही वेळापूर्वी समोर आलं होतं. पण या दुर्घटनेमध्ये 10 ते 11 रूग्ण दगावल्याची प्राथमिक माहिती नाशिक मनपा आयुक्त यांनी दिली होती. त्यानंतर आता नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे तेथे पोहचल्यानंतर दिलेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा 22 वर पोहचला आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये ही गळती वॉल्व लिकेजमुळे झाली आहे. दरम्यान काही काही वेळातच तांत्रिक दुरूस्ती नीट करण्यात आली असून ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे असे सांगण्यात आले आहे.

नाशिक मनपा आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर मिळून 150 जणांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जात होता त्यापैकी 23 व्हेंटिलेटर वर होते पण अचानक गॅस गळती झाल्याने 10-11 जणांचा नाहक जीव गेला आहे. ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.

नाशिक येथील डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयातील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही सगळेच या सर्व कुटुंबांच्या दु:खात सहभागी आहोत. पालकमंत्री छगन भुजबळ आणि सर्व अधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या संपर्कात आहेत. ह्या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी केली जाईल, असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

नाशिक येथील रुग्णालयात ऑक्सिजन लीक झाल्यामुळे घडलेल्या दुर्घटनेची बातमी ऐकून व्यथित झालो आहे. या दुर्घटनेत ज्या लोकांनी आपले प्राण गमावले आहेत त्यांच्याबद्दल तीव्र संवेदना व्यक्त करतो. सर्व रुग्णांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना, अशा भावना केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केली आहे.

नाशिक मधील झाकीर हुसेन रुग्णालयात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक आहे. ऑक्सिजनच्या गळतीमुळे २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समजले. सरकार ने जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर त्वरीत कारवाई केली पाहिजे. तसेच अशा घटना राज्यात पुन्हा घडू नयेत यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत, अशा भावना खासदार संभाजी छत्रपती यांनी व्यक्त केल्या आहेत.

पालकमंत्री छगन भुजबळ यांना या घटनेची माहीती मिळताच तातडीने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व या संपुर्ण प्रकरणाची माहिती ते सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेत आहेत.