पुणे आणि अन्यत्र कडक लॉक डाउन लावा, मुंबई उच्च न्यायालयाची मुख्यमंत्र्यांना सूचना

विशेष प्रतिनिधी 
मुंबई / पुणे तसेच राज्यात ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे तिथे त्वरित कडक लॉकडाउन लावण्याची सूचना मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. पुण्यातील स्थिती अद्यापही गंभीर आहे. त्यामुळे पुणे तसेच ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे,  तिथे गेल्या वर्षीसारखा लॉकडाउन लावा. याबाबत आम्हाला आदेश द्यायला लावू नका असेही न्यायालयाने यावेळी म्हटले आहे . राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा मुंबई उच्च न्यायालय घेत असून सुनावणीदरम्यान ही सूचना करण्यात आली.


पुण्यात अॅक्टिव्ह केसेस १.४ लाख आहेत. आतापर्यंत राज्यात पुण्यातील रुग्णसंख्या सर्वाधिक राहिली आहे. अन्य ठिकाणांहून पुण्यात लोक उपचारांसाठी येत असल्याने ही संख्या जास्त असल्याचे सरकारने सांगितले.न्यायालयाने यावेळी पुण्यातील संख्या चिंताजनक असल्याचे सांगितले .

मुंबई मॉडेलचे  सर्वोच्च न्यायालयाने  कौतुक केले असेल तर इतर पालिकांनीही हे मॉडेल स्वीकारले पाहिजे असा सल्ला उच्च न्यायालयाने यावेळी दिला. तसेच पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे यांनी यशस्वी मॉडेलपासून प्रेरणा घेत समान कार्यक्रम आखला पाहिजे असे मत नोंदवले.