
कोरोनाच्या दुसऱया लाटेत 23 एप्रिल ते 6 मे या दोन आठवडय़ात देशाच्या इतर भागात रोज रुग्ण संख्येत वाढ होत असताना महाराष्ट्रासारख्या मोठय़ा राज्यासाठी दिलासा देणारे शुभसंकेत मिळत आहेत. या काळात इतर राज्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत 35 ते 198 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
मात्र, महाराष्ट्रात पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत 0.22 टक्क्यांनी घट झाली. ही महामारी रोखण्यासाठी राज्यातील सरकारने आणि प्रशासनाने उचललेली ठोस पावले तसेच कडक निर्बंधाची अंमलबजावणी केली. यामुळे कोरोना उतरणीला लागल्याचे दिसत आहे.
निगेटिव्ह ग्रोथरेट वाढणे म्हणजे पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढीचा वेग कमी होणे हे दिलासादायक मानले जाते.
23 एप्रिल ते 6 मे या दोन आठवडय़ांचा डाटा पाहता त्याआधीच्या चौदा दिवसांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे स्पष्ट होते.
देशात कोरोनाची लाट रोखण्यासाठी केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. के. विजय राघवन यांनी उपाययोजना सुचविल्या आहेत. कठोर पावले उचलून नियमांची काटेकोर अंमलबजावणी केल्यास कदाचित ही तिसरी लाट येणार नाही. ही लाट रोखण्यात आपण यशस्वी होऊ असे डॉ. राघवन यांनी म्हटले आहे.
कोरोनाची तिसरी लाट अटळ असल्याचे डॉ. के. विजय राघवन यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते. यामुळे देशभरात आणखी चिंता वाढली.
- महाराष्ट्रात 23 एप्रिल ते 6 मे काळात रुग्णसंख्या 8.5 लाख झाली. पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 0.22 टक्क्यांनी कमी झाली आहे.
- याच काळात राजधानी दिल्लीत पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत 35 टक्क्यांनी वाढ होऊन 3.2 लाखांवर गेली. उत्तर प्रदेशात 54 टक्के रुग्णसंख्या वाढून 4.6 लाखांवर दोन आठवडय़ांत गेली आहे.
- तामीळनाडूत रुग्ण संख्या 117 टक्क्यांनी वाढली.
- कर्नाटकात पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढ तब्बल 175 टक्के असून, 5.2 लाख रुग्ण 23 एप्रिल ते 6 मे या काळात आढळले. केरळातही ही वाढ 198 टक्के आहे.











