१८ ते ४४ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला स्थगिती, ४५ वर्षांच्या वरच्या नागरिकांच्या दुसऱ्या डोसला प्राधान्य प्रतिनिधी

मुंबई / १८ ते ४४ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला तूर्त स्थगिती देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हा निर्णय जाहीर केला. लसींच्या तुटवड्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करताना ४५ वर्षांच्या वरच्या नागरिकांच्या दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे टोपे म्हणाले. 
गेल्या काही दिवसांपासून राज्यात  लसींच्या तुटवडा असल्याने अनेक ठिकाणी केंद्रे बंद करावी लागली होती. 

४५ वर्षावरील लाखो नागरिकांचा दूसरा डोस अजूनही बाकी आहे. त्यातच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसी करणामुळे अतिरिक्त ताण आला होता. हे सर्व पाहून हा निर्णय घेण्यात आल्याचे टोपे म्हणाले . सध्या ४५ वर्षांच्या वरच्या नागरिकांचे  लसीकऱण गरजेचे असल्याने खरेदी केलेल्या लसी त्यांच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्यात य़ेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. जर दुसरा डोस वेळेत घेतला नाही तर पहिल्या डोसचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे आता सर्वात आधी ४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण पूर्ण करणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. त्यामुळे १८ वर्षांवरील नागरिकांनी पहिल्या डोसची अपेक्षा करु नये, लसीच्या उपलब्धतेनुसार याबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले. 


 सध्याचा लॉकडाउन ३१ मेपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे संकेत राजेश टोपे यांनी देताना याबाबत चा अंतिम निर्णय मुख्यमंत्री जाहीर करतील असेही ते म्हणाले.