शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळा येथील रिसॉर्ट वर CBI आणि ED चे छापे

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात रडारवर असलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, सक्तवसुली संचलनालय (ED) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) याप्रकरणात लोणावळा येथील एका रिसॉर्टवर एकत्रितरित्या धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे.

काहीवेळापूर्वीच ED आणि CBI चे अधिकारी याठिकाणी पोहोचले असून याठिकाणी सध्या शोधसत्र सुरु आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सीबीआय आणि ईडीने प्रताप सरनाईक यांना ताब्यात घेण्यासाठी ही धाड टाकल्याची चर्चा आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही प्रताप सरनाईक गायब असल्याचा आरोप केला आहे. याबाबत थोड्याचवेळात अधिकृत माहिती जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी ईडीने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलाची चौकशी केली होती.

परंतु, नंतर हा तपास काहीसा थंडावला होता. मात्र, आता प्रताप सरनाईक यांच्या रिसॉर्टवर धाड टाकल्यामुळे याप्रकरणात नवी माहिती पुढे येणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात ईडीने प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर ईडीने प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग यांचीही चौकशीही केली होती.

ही चौकशी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच भविष्यात आपण ईडीला सहकार्य करण्यासाठीही तयार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले होते.

तत्पूर्वी ईडीने टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी 25 नोव्हेंबरला अमित चांदोळे यांची ईडीने कसून चौकशी केली होती. त्यानंतर अमित चांदोळे यांना अटकही करण्यात आली होती. अमित चांदोळे हे प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार होते.