
व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लोकांना सामाजिक अंतर, मास्किंग आणि कोरोना प्रोटोकॉलचे अनुसरण करण्याचे आवाहन सातत्याने केले जात आहे. मात्र अजूनही कुठे गोमुत्राचे सेवन केले जात आहे तर कुठे शेणाने अंघोळ केली जात आहे. आता कोयंबटूरमध्ये तर चक्क कोरोना देवीची मूर्ती बसवली आहे व पुजारी रोज तिची पूजा करीत आहेत.
कोरोनाचा विनाश टळावा म्हणून लोक पूजा-अर्चना करत आहेत. अशीच एक घटना तामिळनाडूच्या (Tamil Nadu) कोयंबटूर (Coimbatore) येथून समोर आली आहे. येथील प्रसिद्ध मंदिरात, लोकांनी कोरोना देवीची मूर्ती बसवली आहे. अगदी न चुकता सकाळी आणि संध्याकाळी तिची पूजा केली जात आहे. हे मंदिर तामिळनाडूच्या कोयंबटूरमधील कामाचीपुरी अध्यायचे एक मंदिर आहे.
मूर्ती ग्रॅनाइटपासून बनविली गेली आहे. या मंदिरामध्ये कोरोना देवीची 48 दिवस विशेष पूजा ठेवली आहे. त्याचवेळी महायज्ञ आयोजित केला जाईल, ज्या दरम्यान लोकांना मंदिरात पूजा करण्यास परवानगी दिली जाणार नाही. असे म्हणतात की या मंदिरात आपत्तीपासून वाचण्यासाठी देवी-देवतांच्या मूर्ती बनविण्याची परंपरा चालू आहे. उदाहरणार्थ, तमिळनाडूत कोयंबटूरमधील प्लेग मरिअम्मन मंदिर अशी देवता आहेत.

वाराणसीच्या जैन घाटावर तसेच असमामध्येही ग्रामीण भागात कोरोना विषाणूला देवी मानून महिला सकाळ संध्याकाळ तिची पूजा करताना दिसत आहेत. त्यांचा विश्वास आहे की अशा पूजेने ही देवी लवकरच लोकांना या आजारातून मुक्त करेल. या महिलांनी देवीला प्रसन्न करण्यासाठी तिची 21 दिवस पूजा करण्याचा संकल्प सोडला आहे.











