
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी निर्बंध शिथीलकरणाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. निर्बंध शिथील करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून येत्या काही दिवसांत मुंबईत निर्बंध शिथील होऊ शकतात, असे पालकमंत्री अस्लम शेख (Guardian Minister Aslam Sheikh) यांनी म्हटले आहे.
या अंतर्गत हॉटेल व्यवसाय, व्यापारी, कापड उद्योग यांना सूट देण्याचा विचार सुरु असून सर्व व्यवहार सुरळीत करण्याबाबतही विचारविनिमय केला जात आहे, असे शेख यांनी सांगितले. मात्र निर्बंध शिथीलकरणासाठी जास्तीत जास्त लसीकरण होणे गरजेचे आहे. परंतु, केंद्र सरकारकडून लसपुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्याने लसीकरणाचा वेग मंदावला आहे. परिणामी निर्बंध शिथिलकरणाची अंमलबजावणी देखील लांबणीवर पडली आहे, असेही शेख म्हणाले.
दरम्यान, कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना मुंबई लोकलने प्रवासाची मुभा मिळणार, असे बोलले जात होते. तशी मागणीही अस्लम शेख यांनी केली होती. मात्र त्यावर मंत्रीमंडळ बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. मात्र लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्याचा विचार सुरु असल्याचे शेख यांनी सांगितले आहे.






