माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन

विश्वचषक जिंकलेल्या भारतीय क्रिकेट संघाचे सदस्य यशपाल शर्मा यांचे मंगळवारी हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असे कुटुंब आहे. यशपाल शर्मा यांच्या निधनानंतर क्रिकेट जगतातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

यशपाल शर्मा यांनी 1972 साली शालेय स्तरावर पंजाबचे प्रतिनिधित्व करताना जम्मू-कश्मीरविरुद्ध 260 धावांची खेळी साकारली. त्यानंतर दोन वर्षांमध्येच त्यांनी राज्याचे प्रतिनिधित्व केले. विझ्झी ट्रॉफी जिंकलेल्या उत्तर विभाग संघाचे ते सदस्यही होते. दुलीप ट्रॉफीमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला. उत्तर विभागासाठी खेळताना त्यांनी 173 धावांची खेळी साकारली. त्या वेळी दक्षिण विभागीय संघात चंद्रशेखर, इरापल्ली प्रसन्ना व वेंकटराघवन हे दिग्गज गोलंदाज होते. यशपाल शर्मा यांनी 1979 साली इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. 37 कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.

कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी 1606 धावा केल्या. यात दोन शतके व नऊ अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांची सर्वेत्तम खेळी 140 होती. 1983 साली त्यांनी वेस्ट इंडीजविरुद्ध अखेरचा सामना खेळला. यशपाल शर्मा यांनी 1978 साली पाकिस्तानविरुद्ध पहिला वन डे सामना खेळला. 42 वन डे सामन्यांमध्ये त्यांनी 883 धावा केल्या. क्रिकेटच्या या प्रकारात त्यांनी चार अर्धशतके झळकावली. यशपाल शर्मा हे मधल्या फळीतील फलंदाज होते. त्याचसोबत चपळ क्षेत्ररक्षकही होते.