रायगड जिल्ह्यात पाच ठार, महाड शहराला पुराचा वेढा, कोल्हापूर, सांगलीसह अनेक ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर

राज्यातील पावसाचा जोर कायम असून अनेक ठिकाणी हलका, मध्यम ते मुसळधार स्वरुपात पाऊस (Maharashtra Rains Updates) कोसळतो आहे. पश्चिम महाराष्ट्र (Paschim Maharashtra), कोकण (Konkan), उत्तर महाराष्ट्र, विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाडा (Marathwada) अशा सर्व विभागांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे गावे, शहरे आणि परिसर पाण्यात गेली आहेत. प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळून येथे आजवरच्या इतिहास प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर महापूर पाहायला मिळत आहे. या शिवाय रायगड जिल्ह्यातील महाड शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. रायगडमध्ये मुसळधारपावसामळे पाच जण ठार झाल्याची माहिती आहे. तर कोल्हापूर, सांगली यांसारख्या नदीकाटच्या शहरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस संततधार बरसतो आहे. आतापर्यंत रायगड जिल्ह्यात 5 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.महाड शहरात पाणी साचल्याने जनजिवन विस्कळीत झाले. एनडीआरएफचे जवान शहरात पोहोचले आहेत. एनडीआरएफच्या जवानांनी हेलिकॉप्टरमधून पाहणी करत नागरिकांना अन्नाची पाकिटं दिली. तसेच, पुराच्या पाण्यात कोणी अडकले आहे का याचाही शोध सुरु आहे. रात्री अचानक मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने शहरात पाणी शिरले अनेक घरांच्या दुसऱ्या मजल्यांपर्यंत पाणी पोहोचले.

सांगली शहरालगत असलेल्या कृष्णा नदीला पूर आला आहे. कृष्णा नदीचे पाणी धोकादायक पातळीपर्यंत पोहोचले आहे. आयर्विन पुलावरुन पाणी वाहात असून, या पुलावरुन 38 फुटांच्याही वर पाणी वाहात आहे. . कृष्णेची 40 फूट इशारा पातळी तर 45 फूट धोका पातळी आहे. पाणी अशाच प्रकारे वाढत राहिले तर लवकरच धोकादायक पातळी ओलांडली जाण्याची शक्यता आहे.

पुराच्या संभाव्य धोक्यामळे कोल्हापूर जिल्हा मधील अनेक गावातील लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.