
रायगड (Raigad) जिल्ह्यातील महाड (Mahad) येथील तळीये गाव (Taliye Village) दरड कोसळून उद्धवस्त झाले आहे. तर अतिवृष्टीमुळे महाड शहराचे अतोनात नुकसान झाले आहे. या शहराला पुन्हा सावरण्यासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज महसूल विभागाने तयार केलेल्या मदत केंद्राला भेट देऊन ताताडीने आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शहर स्वच्छतेसाठी तातडीचा निधी जाहीर केला असून पुढील दोन दिवसांत हा निधी वितरीत करणार असल्याची घोषणा केली आहे. टीव्ही9 च्या वृत्तानुसार, महाड शहर स्वच्छतेसाठी 50 लाखांचा निधी देण्यात येणार आहे.
महाड शहर स्वच्छ करण्यासाठी वेगवेगळ्या नगरपालिकांचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसंच ठाणे महानगरपालिकेने पाठवलेली ड्रेनेज स्वच्छ करणारे टँकर्स आणि पुणे महानगरपालिकेने पाठवलेले जनरेटर्स तातडीने स्थानिक प्रशासनाला सुपूर्त करण्यात आले आहेत. त्याचबरोबर उद्यापासून स्वच्छता मोहीम हाती घेऊन 4 दिवसांत महाड शहर पूर्णपणे स्वच्छ करण्याचे आदेश त्यांनी स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.






