
शारजाह येथे संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाला आयपीएल (IPL) इतिहासातील सर्वात मोठ्या लज्जास्पद पराभवाला सामोरे जावे लागले आहे. केकेआरने (KKR) दिलेल्या 172 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात राजस्थान अवघ्या 85 धावांवर ढेर झाला. परिणामी संघाला 86 धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला आहे. रॉयल्सच्या पराभवामुळे त्यांचे प्लेऑफ गाठण्याचे स्वप्न भंग झाले तर कोलकाताने अंतिम चार संघात आपला प्रवेश निश्चित केला आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या (Kolkata Knight Riders) विजयात शुभमन गिल आणि गोलंदाजांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. केकेआरकडून शिवम मावीने (Shivam Mavi) सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तसेच लॉकी फर्ग्युसनला 3, शाकिब अल हसन आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. दुसरीकडे, राजस्थानसाठी अष्टपैलू राहुल तेवतियाने (Rahul Tewatia) सर्वाधिक 44 धावा केल्या. तर शिवम दुबेने 18 धावांचे योगदान दिले. याशिवाय रॉयल्सचा अन्य कोणताही फलंदाजी दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही.
या विजयाच्या जोरावर कोलकाताने पॉईंट टेबलवरील आपले चौथे स्थान कायम ठेवण्यास आणि त्यांचा नेट रनरेट मोठ्या फरकाने वाढविण्यात मदत झाली. इयन मॉर्गन आणि कंपनीकडे आता एक उत्तम NRR आहे ज्यामुळे ते बाद फेरीसाठी पात्र ठरू शकतात. दरम्यान, केकेआरच्या विजयामुळे गतविजेता मुंबई इंडियन्सपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. SRH विरुद्ध शुक्रवारी होणाऱ्या अंतिम लीग सामन्यात त्यांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी मोठा विजय मिळवावा लागेल.











