मेडिकल कॉलेजमधील १८२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, फ्रेशर्स पार्टी पडली महागात – बाधितांचे दोन्ही डोस पूर्ण होऊनही लागण

 

धारवाड / कर्नाटक मधील धारवाड येथील एसडीएम कॉलेज ऑफ मेडिकल सायन्समध्ये कोरोना संसर्गामुळे हाहाकार उडाला आहे. येथील १८२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. गुरुवारी हा आकडा केवळ ६६ इतका होता.

कोरोनाबाधितांची संख्या आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जाते. धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाचा संसर्ग झालेले विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी कोरोना लसींची दोन्ही डोस घेतले होते. या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये काही दिवसांपूर्वीच फेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीनंतरच कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून आले आहे.

या मेडिकल कॉलेजमध्ये एकूण ४०० विद्यार्थी आहेत. त्यापैकी ३०० विद्यार्थ्यांच्या चाचण्या झाल्या असून त्यापैकी १८२ विद्यार्थींना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एका आठवड्यापूर्वी कॉलेज कॅम्पसमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता फेटाळता येत नाही. धारवाडचे उपायुक्त नितेश पाटील यांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार ६६ विद्यार्थ्यांना करोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये संसर्ग झालेल्यांची संख्या वाढली असून आज उर्वरित १०० जणांची चाचणी केली जाणार आहे. या कॉलेजशी संबंधित कर्मचाऱ्यांच्याही कोरोना चाचण्या केल्या जाणार आहेत. सध्या संसर्ग झालेल्या विलगीकरणामध्ये ठेऊन त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

आरोग्य अधीक्षक असणाऱ्या डी. रणदीप यांनी करोना संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या चाचण्यांनंतर जीनोम सिक्वेन्सिंगसाठीही हे नमुने पाठवण्यात येणार आहेत. करोना संसर्गाचा हा विस्फोट एखाद्या नवीन करोना व्हेरिएंटमुळे झालेला नाही ना?, हे तपासून पाहण्यासाठी या चाचण्या केल्या जाणार आहेत. सध्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमधून बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

हुबळी-धारवाडचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ, यशवंत यांनी संसर्ग झालेल्यांपैकी अनेकांना कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस मिळाले होते. सध्या या सर्वांना हॉस्टेलमध्येच विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले आहे, अशी माहिती दिली. या संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये कोणतीही गंभीर लक्षणं दिसून येत नसल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे.