पुस्तकाबाहेरील शिक्षण: साताऱ्यातील शिक्षक बालाजी जाधव यांचा जिल्हा परिषद शाळेत कौशल्य विकास क्षेत्रात आगळा वेगळा प्रयोग

खरं तर शिर्षक पाहून प्रत्येकाला वाटेल की मग पुस्तकातील शिक्षणाचं काय ? पण पुस्तकातील सर्व अध्ययन निष्पत्ती पूर्ण करूनच हे पुस्तकाबाहेरील शिक्षण माझ्या विद्यार्थ्यांना मला द्यावे अशी कल्पना सुचली.ही कल्पना सुचाण्याचे  अनेक करणे आहेत त्यामधील सर्वात प्रमुख कारण म्हणजे माझ्या आंतराष्ट्रीय पुरस्काराच्या मुलाखतीत मला विचारला गेलेला प्रश्न होता.तुम्ही शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना पुस्तका बाहेरचं म्हणजे जे असं की विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात त्याचा फायदा होईल असं काही शिकवता का ?आणि मग माझ्याकडे याचं उत्तर अगदी अल्पसं आलं म्हणजे खरं तर वेळ मारून नेण्यासाठी मी मुल्य शिक्षण असे उत्तर दिलं होतं,व काही प्रमाणत ते खरेही होतं.मात्र त्या दिवशी पासून मी विचार करायचो की असं आपण खरचं काही शिकवतो का की ज्याचा उपयोग माझ्या विद्यार्थ्यांना भविष्यात त्यांचं आयुष्य सुलभ करण्यास व राष्ट्र उन्न्त्तीच्या कामात उपयोगी पडेल ?

                           मग मी विचार केला की आपण असं काही का शिकवत नाही ? त्याचं उत्तर मलाखूप विचार केल्यानंतर असं भेटलं की काहीतरी असं नाविन्यपूर्ण शिकवायचं असल्यास ते अगोदर आपल्याला आलं पाहिजे. मग मला असं काय येतं ? किंवा मी असं काही माझ्या शालेय जीवनात शिकलो की जे पुस्तका बाहेरचं आहे व ते सध्या माझ्या आयुष्यात मला लाभदायक ठरून त्याचा राष्ट्र उन्नती किंवा इतरांना फायदा होतोय? आणि चटकन माझे श्री. गाडे सर मला आठवले की जे गणित तर सर्वोत्तम शिकवायचे मला पण मला त्यांना वक्तृत्व व वादविवाद कौशल्य सातत्याने शिकवून विविध स्पर्धामध्ये मला सहभागी करून यशाचा एक नवा मार्ग दाखवला व आज त्या एकमेव कौशल्या मुळे मी देशभरातील शिक्षकामासाठी २०० कार्यशाळा घेवून शिक्षणातील विविध प्रयोग जगासमोर सहजपणे मांडतोय व इतरांना ही  त्याचा खूप फायदा होतोय.

                           मग एक शिक्षक म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांना मला असं काही शिकवायचं असल्यास मी काय करू शकतो ? हा विचार सर्वप्रथम माझ्या डोक्यात आला आणि मग त्याचं उत्तर भेटलं की जे शिकवायचं ते अगोदर तुम्हाला आलं पाहिजे. हे सर्व जून  २०२० मध्ये विचार सुरु होते, कोविड  मुळे शाळाच काय पूर्ण जग बंद होतं आणि मग ठरवलं की आपणही असं काहीतरी शिकायचं की आपल्याला ते आपल्या विद्यार्थ्यासाठी उपयोगी ठरेल आणि मग त्याची यादी करणे सुरु झाले व ऑनलाईन ते कसे व कोठून शिकता येईल याबद्दल माहिती घेवू लागलो आणि शिकायला सुरुवात पण केली.आणि जवळपास ३ ते  ४ महिन्यात मी माझ्या मुलीबरोबर भक्ती बरोबर घरी बसून काही कोर्सेस पूर्ण केले व अशा काही बाबी किंवा कौशल्य शिकलो की जे मी माझ्या शालेय अथवा डीएड मध्येही मला शिकायला भेटले नाहीत,जे खरं तर एक शिक्षक म्हणून अशा बाबी शिकणं आवश्यक असतं.

                           आता या बाबी मी शिकलो मात्र शिकलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला विद्यार्थ्यांना सहजपणे शिकवता येतेच असे नाही कारण एक तर ती नवीन असते, त्यासाठीचे आवश्यक साहित्य उपलब्ध असावे लागते ,त्यासाठी वेगळा वेळ दयावा लागतो ,प्रत्येक विद्यार्थ्यांना वेगळ्या गोष्टीत रस असतो,पुरेसं मनुष्यबळ, आर्थिक पाठबळ, मग मी तर १ ते ४ च्या शाळेत एकटाच शिक्षक,कोविड मुळे CSR आरोग्या कडे वळला होता ,अशा एक न अनेक अडचणी माझ्या समोर उभ्या राहिल्या ,मात्र मी ठरवले की या वर्षी काही झाले तरी कमीत कमी ५ अशी कौशल्य मुलांना शिकवायची जे त्यांना आयुष्यभर उपयोगी पडतील.त्यात विविधता पण असावी आणि मी मग त्याप्रमाणे ५ कौशल्य निश्चित केले

१) पियानो वादन.  २) साबण निर्मिती.  ३) वारली चित्रकला.

४) धनुर्विद्या. ५) घड्याळ निर्मिती.

सुरुवात अशी केली:-

१) पियानो वादन –

                           पियानो वादन मी लॉकडाऊन मध्ये ३ महिने शिकलो होतो मात्र तेही अगदी जुजबीच मात्र आवश्यक तेवढं.मी ऑनलाईन शिकलो आता माझी शाळा अशा ग्रामीण व दुर्गम भागात आहे की जिथे २ % पालक स्मार्ट फोन वापरतात आणि एक पियानो विकत घ्यायचा तर ५  ते १०  हजार रु लागतात.पण योगायोगाने मागील वर्षीच अतुल फौंडेशन गुजरात यांनी माझ्या इनोव्हेटिव्ह कामामुळे माझ्या शाळेला tab दिले होते आणि आमचा तो मोठा प्रश्न इथे सुटला ,मी पण tab वरच पियानो शिकलो व विद्यार्थ्यांना पण tab वरच शिकवण्याचं ठरवले.पण शाळा बंद असल्याने ऑनलाईन तर शिक्षण शक्यच नव्हते आमच्या शाळेच्या परिस्थिती नुसार मग ब्लेंडेड पद्धत वापरायची ठरवली व दर २ दिवसांनी प्रत्येकाच्या घरी जावून मी त्यांना घरी tab दिले व नियमित अभ्यासा सोबत थोडसं पियानो नावाचं app आहे त्यावर मुलांना एक एक ओळ वाजवायालो व तुम्ही सराव करा मला २ दिवसांनी वाजवून दाखवा असं सांगितलं सुरुवातीला नक्कीच अडथळे येत गेले मात्र २ आठवड्यानंतर मुले चांगला रिस्पॉन्स देवू लागले.एप्रिल व मे २०२१  मध्ये शाळेच्या परिसरात कोविड  रुग्ण वाढले व मी घरोघरी जाने बंद झाले.पुन्हा शिकणं बंद.

                           मात्र मे च्या शेवटी परिस्थिती पुर्वावत झाली आणि जून महिन्यात सर्व पालकच मला शाळा सुरु करण्याबद्दल आग्रह करू लागले व आम्ही लेखी देतो असे म्हणून सर्वांनी लेखी दिले व १५ जून पासून आमची ३ तासाची शाळा सुरु झाली.व मग वरील सर्वच गोष्टी एका व्यवस्थितपणे सुरु झाल्या. व आज इयत्ता २ रि ते ४ तचे सर्व मुले चांगल्या प्रकारे छोटी छोटी गाणे, देशभक्ती गीते, प्रार्थना tab वरील पियानो मध्ये वादन करतात. भविष्यात त्यांना जिथे कुठे हि साधने उपलब्ध होतील तिथे हि प्रत्यक्ष वादन करून चांगले कलाकार होतील याची मला खात्री आहे.व हे यथेच थांबले नाही तर हि फक्त सुरुवात आहे यापुढे यत सातत्य ठेवणे हे आमच्या पुढे आव्हान असणार आहे कारण मी ४ वर्गाला एकच शिक्षक, विविध प्रशासकीय कामे पण मी करत राहीन…..आणि हो मी अद्याप शिकणे थांबवले नाही … मी त्यातील नवीन नवीन शिकतोय कारण मला माझ्या विद्यार्थ्यासाठी सातत्याने नवीन द्यायचं आहे.

२) साबण निर्मिती :-

                  हे मी खास कारणाने शिकलो , जिथे माझी शाळा आहे तेथील ८० % पालक रंगकाम करण्यासाठी मुंबई, पुण्याला जातात मुले वृद्ध आजी आजोबा पाशी राहतात, मी जवळपास ४ वर्षे झाली या शाळेत आहे मुलांच्या स्वच्छते बद्दल किती तरी वेळा पालक  भेटी घेवून सुद्धा फरक पडत नव्हता आणि मग ठरवले की आपणच शाळेत साबण बनवायचे व ते घरी द्यायचे.लॉक डाऊन मध्ये हे हि मी घरी बसून शिकलो आवश्यक साहित्य ऑनलाईन मागवून घरी याचे प्रयोग करून पहिले आणि मग त्यासाठी आवश्यक सर्व साहित्य विकत घेणे परवडणारे नव्हते मग यातील काही गोष्टी आपण स्वत: उत्पादन करू शकतो हे माझ्या लक्षात आले व त्यातील प्रमुख घटक म्हणजे कोरफड, शाळेशेजारी एका घरी खोप कोरफड होती ती लॉक डाऊन मध्ये आणून शाळेत लावली व ती चांगली आली सुद्धा. आणि त्यासाठी लागणारे सोप बेस ,मोल्ड हे ऑनलाईन मागवले व त्याच्या साह्याने प्रक्रिया सुरु केली.त्यासाठी मिक्सर लागतो,शाळेत वीज लागते, मी शाळे शेजारील घरून स्वताच्या पैशाने वीज विकत घेवून वापरतोय ,आणि फ्रीज पण लागतोय मग सुरुवातीला मी हे सर्व माझ्या घरून करून आणायचो मात्र मुलांना सर्व प्रोसेस समाजात नव्हती,मग शेजारील गुळीग काका यांना विनंती करून त्यांचा मिक्सर शाळेत आणून मुलांना सर्व प्रोसेस प्रात्यक्षिक दाखवून ते २४ तास फ्रीज मध्ये ठेवण्यास सुद्धा पालकांची मदत सातत्याने घेतली. व तयार सबाने शाळेत,जेवणापूर्वी, स्वच्छतागृह याठिकाणी तर वापर होवू लागला सोबत प्रत्येक मुलाला २ आठवड्याला घरी १ साबण देण्यास सुरुवात केली व मुलांच्या स्वच्छता व आरोग्य याचा मोठा प्रश्न आज सुटला आहे मात्र यासाठी आर्थिक पाठबळ लाभल्यास पूर्ण गावाला अल्प किमतीत साबण पुरवठा करण्याचा व त्यातून निधी उपलब्ध करण्याचा  आमचा मानस असून फक्त वर्तमान च नव्हे तर मुलांनी भविष्यात साबण बनवण्याच्या व्यवसायत उतरून उद्योगपती व्हावे हा सुद्धा हेतू ,भविष्यकालीन धोरण आहे.

३) वारली चित्रकला.

                  माझ्या आयुष्यात मला कधीच शालेय जीवनात चित्रकला शिक्षक लाभले नाहीत मला चित्र काढणा-या बद्दल खूप कुतुहूल असायचं,कारण आपल्याला न येणा-या गोष्टी बद्दल प्रत्येकाला कुतुहूल असतेच,आणि मग ठरवले मी माझे विद्यार्थी तरी असे होऊ नयेत किंवा त्यांच्या वर हि वेळ येऊ नये.आणि वारली चित्रकला खास करून मला विशेष भुरळ घालायची म्हणून मी त्याचे ऑनलाईन प्रशिक्षण घेतले व हे अगदी कमी खर्चात शाळेत राबवणे शक्य होणार होते तरी सुद्धा निर्भीड फौंडेशन म्हसवड चे डॉ चेतन गलंडे सर आम्हाला दरवर्षी मुलांना चित्रकलेचा सेट देतात त्याचा वापर आम्ही हे शिकण्यासाठी करू लागलो, मुले सहजतेने हे शिकू लागली, यातून आकार शिकायला मिळू लागले अभ्यासचा कंटाळा आला की मी हे घ्यायचो मग मुले ताजे तवाने पण व्हायचे,काही महिन्यात मुले कागदावर छान वारली चित्रे रेखाटू लागले आणि मी ठरवले की हेच काम आता शाळेच्या भिंती वर करण्यासाठी हजारो रुपये जातात मग पालकांना विनंती करून रंग आमचा व काम तुमचं असं म्हणून त्यांच्याकडून शाळेच्या सर्व खोल्या, संरक्षक भिंती रंगवून घेतल्या व त्या भिंती वर आम्ही ब्रश व रंग हातात घेवून धडपडू लागलो,आम्हाला लक्षात आले की कागदावर व भिंती वर मोठं फरक आहे ,मी सातत्याने या सर्व बाबी बद्दल नवीन नवीन माहिती घेवून सहजता आणण्यासाठी प्रयत्न करत होतो काही दिवसा नंतर आम्हाला ते येवू लागले व सुट्टीच्या दिवशी पण आमची शाळा वारली चित्रकला साठी गजबजू लागली व काही दिवसात आमच्या शाळेचा कोपरा नी कोपरा वारली मय झाला.

                           आम्ही इथेच थांबलो नाही तर मी गुगल इनोव्हेटर शिक्षक असल्याने मागील ५ वर्षापसून जगभरातील ४० देशासोबत आम्ही व्हर्च्युली जोडले गेले आहोत मग नुसते परदेशी शाळांकडूनच आम्ही शिकतो असे नव्हे तर २२ देशां सोबत ‘Culture  Exchange Programme’ या उपक्रमा अंतर्गत आम्ही तेथील शाळांना वारली चित्रकला व किल्ला निर्मिती प्रशिक्षण देवू आपलं संस्कृतीचे वसा हि आम्ही जपत आहोत.भविष्यात माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरीच नव्हे तर त्याच्या कार्यालयात त्यांनी रेखाटलेले वारली पोर्ट्रेट मला पहायचे आहेत.व जगभरात वारली चित्रे एक्स्पोर्ट करताना मला माझ्या विद्यार्थ्यांना पहायचे आहे.

४) धनुर्विद्या.        

         लॉक डाऊन मध्ये घरी असल्याने माझी मुलगी भक्ती मला विचाराची की पापा तुम्ही माझ्या वयात कोणकोणते खेळ खेळायचे आणि यामध्ये मग धनुर्विद्या चा उल्लेख होताच मला पण शिकवा असा तिचा सूर येवू लागला व मग जसा मी लहानपणी लिंबाच्या झाडावर चढून त्यांची छोटी फांदी तोडायचो व त्याला दोरी बांधून धनुष्यबाण करायचो अगदी तसा माझ्या मुलीला मी बन तिच्या समोर करू दाखवला व घरासमोरील मोकळ्या जागेत आम्ही दररोज सराव करायला लागलो तर सहजपणे तिला तो चांगला येवू लागला. सोबतच ओल्म्पिम्क २०२० मध्ये आमच्या सातारा जिल्ह्यातील प्रवीण जाधव नावाचं अगदी समान्य कुटुंबातील मुलगा धनुर्विद्या मध्ये जगभरात आपलं कौशल्य दाखवत होता या प्रेरणेतून आपल्या शाळेत हे सहजपणे होवू शकते याची मला कल्पना आली आणि शाळेभोवती असणाऱ्या लिंबाच्या झाडावर ४ ठी ची मुले भराभर चढून छोट्या फांद्या कढून आम्ही धनुष्यबाण बनवले व शाळेत tab वर त्यांना कसा ,असतो बाण, कस नेम धरतात, हे सर्व प्रक्रिया दाखवून शाळेचा संरक्षक भिंतीवर गोल करून १० फुट अंतरावरून आम्ही धनुर्विद्या शिकण्यास सुरुवात केली. सर्व पालक या बाबी ब पाहण्यास शाळेकडे येत व म्हणत की आमच्या वेळी नव्हती बा अशी शाळा गुरुजीच काही तरी नवीनच असतं. बघा लिहण वाचन विसरून जातील असेही काही आजीबाई म्हणायच्या पण मी त्यांना सांगितले की तुम्ही विश्वास ठेवा असे काही व्हायचे नाही.

                  मुले प्राथमिक सर्व कौशल्य शिकली आहेत आता आम्हाला आधुनिक साधनांची आवश्यकता आहे मग त्यांनतर आम्ही स्पर्धेत सहभागी होण्याचा संकल्प केला आहे व भविष्यात ज्याच्या कडे याचं उत्तम कौशल्य आहे त्याला जागतिक स्पर्धेत खेळताना मला पहायचे आहे. यामुळे एकाग्रता वाढण्यास मला साह्य झाले.

५) घड्याळ निर्मिती.      

         नक्कीच घड्याळाचे दिवस कमी होताना दिसत असताना सुद्धा हे मुलांना का शिकवावे वाटले असेल ? तर  घड्याळ ही एक वैश्विक वस्तू आहे तिचे स्वरूप बदलत जाईल मात्र याची निर्मिती कशी होती याची वैयक्तिक मलाही उत्सुकता होतीच व आमच्या मुलांनाही.मग चीनमधल्या एका व्होकेशनल स्कूल मध्ये हा कोर्स सुरु असल्याची मला माहिती भेटली मात्र ते बाहेरील कोणाला प्रवेश देत नाहीत मी वारंवार त्यांना माझे काम व माझा शिकण्याचा हेतू त्यांना कळवत राहिलो आणि त्यांनी काही मोजके व्हिडिओ पाठवण्याची तयारी दर्शवली व त्यातून मी काही पाहू शकलो आणि म्हसवडच्या घड्याळाच्या काझी यांचे सोबत बसून मी घड्याळ कसे असेम्ब्ल होते हे प्रत्यक्ष पाहून  शिकलो आणि त्याचे बनवण्याचे कीट मागवले आर्थिक बाब सर्व स्वताच्या खिशातून च सुरु होती आणि त्याप्रमाणे शाळेत त्याचे डेमो दाखवू  लागलो अगदी बाराकाव्याचे काम असल्याने मुलांना कठीण जावू लागले ,मग यात्रेत मिळणा-या घड्याळाचे सुट्टे पार्ट मागवून ते दाखवू लागलो मग थोडे मुलांना समजू लागले,त्यापुढे जावून यही घड्याला बद्दल मुले हळू हळू शिकत आहेत लवकरच प्रत्येक मुलाला स्वत बनवलेले घड्याळ त्यांच्या हातात असणार आहे. व भविष्यात अशी प्रत्येक बाब तुम्ही स्वता बनवू शकता हा विश्वास मला त्यांना द्यायचा आहे .व एका जगप्रसिद्ध घड्याळाचा ब्रांड माझ्या विद्यार्थ्याच्या नावे आपणास पहावयास मिळेल अशी खात्री मला हळू हळू वाटू लागली आहे.

                           एकूणच शाळेचे दैनदिन काम करत करत या बाबी करणे सहज तर नक्कीच नाही मात्र अशक्य पण नाही,त्यासाठी आर्थिक तरतूद ही मोठी समस्या सर्वांना भेडसावत असते त्यावर सुद्धा प्रत्येकजण आपआपल्या परीने मार्ग काढू शकतात.सहकारी यांची साथ, प्रशासनाचे सहकार्य ,शाबासकी अपेक्षित असते, याचं मूल्यमापन नसल्याने चुकत चुकत शिकत गेलो.माझ्या गरजेनुसार ,आवडीनुसार मी यावर काम करतोय, प्रत्येक शिक्षकांनी असा वेगळा मार्ग शोधावा त्यासाठी मी शक्य त्यांना मदत करण्यास तयार आहे, शासनाकडून यत लक्ष घातल्यास अधिक सहजता व सुलभता येवू शकेल. बस आपला विद्यार्थी हे डोळ्या समोर ठेवल्यास काहीही अशक्य नाही .

Marathi video link

Hindi Video link

English video link

बालाजी बाबुराव जाधव,प्राथ शिक्षक .

जि प शाळा विजयनगर (पर्यंती) ता. माण जि सातारा. ७५८८६११०१५

crcmhaswadno3@gmail.com

www.shikshanbhakti.in