
कॅनडातील समाज जीवनांवर एक नजर
सर्व प्रथम कॅनडातील मुळनिवासी जमाती मध्ये इनुवेट ,मेटीज आणि फर्स्ट नेशन्स या लोकांचा समावेश होतो. ते आपआपल्या इलाख्यात राहून आपली परंपरागत रूढी,संस्कृती, जपत आहेत. यांची लोकसंख्या जेमतेम दिडएक टक्काच आहे.अमेरिकेत जसे रेड इंडीयन्स वर जसे अन्याय अत्याचार झाले तसेच कॅनडातील मुळ निवासीवर झाले.तरीही त्यानी आपली स्वतंत्र ओळख कायम ठेवली आहेच.यातील बहुतांशी बर्फाच्छादित भागात जास्त राहातात.
कॅनडात इंग्रज आले तसेच अनेक देशातूनही लोक आले. वर्चस्वासाठी लढाया झाल्या आणि इंग्रजाची सत्ता प्रस्थापित झाली. काही भागात फ्रेंचांची. येथे आता भारतीय, चीनी, जपानी, पॅन आशियाई मिक्स, ग्रीक, पोर्तुगीज, इथोपियन इत्यादी लोक आपआपली पारंपरिक संस्कृती, खानपान, सणवार जपत आनंदाने राहात आहेत. कोणीच कोणावरही कुरघोडी करण्याच्या भानगडीत पडत नाहीत.
ऑटारिया हा कॅनडातील सर्वात मोठा आणि प्रगत जास्त लोकसंख्या असलेला प्रांत आहे.कॅनडात सर्वंनाच सर्व क्षेत्रात समतेची समान संधी असल्यामुळे अशांततेचा प्रश्न निर्माण होत नाही. सर्व सोयी सुविधा सहज उपलब्ध होतात.
कष्टाला पर्याय नाही हा जागतिक नियम झाला अन् तो सर्वानाच लागू होतो.येथे घरातली सर्वच कामे स्वत: लाच करावी लागतात त्यामध्ये भोजन तयार करणे,भांडी स्वच्छ करणे, घराची सफाई, कपडे ल्राडींग, मुलांना शाळेत सोडणे परत आणणे,त्यांच्या छंदाच्या क्लासेसला उपस्थित ठेवणे आणि जेव्हा बर्फवृष्टी सुरू होते तेव्हा आपल्या घरासमोरील बर्फ साफ करणे अशी एक ना अनेक कामे स्वइच्छेने हसत मुखाने उरकावी लागतातच! त्यासाठी सतत धावपळ, धडपड करावीच लागते आणि हे सर्व करताना स्पर्धा ही आलीच.साहजिकच मनाची ताणाताणी, थकावट होते आणि अशाप्रकारे सोमवार ते शुक्रवार पर्यंत राब राबल्यावर हक्काच्या शनिवार, रविवारी रिलॅक्स साठी विकएंडला मित्रमंडळींबरोबर पिकनिक, पार्टीत रममाण होणे हा सुध्दा कल्चरचा अविभाज्य भाग झाला आहे.अशा प्रकारे तरूण वर्ग रमत आहेत, वयस्कर आपआपले छंद बागकामात, शांतपणे गार्डन मध्ये, सरोवर काठी संगीत, गप्पाष्टाकात आयुष्याच्या सायंकाळी आनंदाने जीवन जगत असतात.
विशेष म्हणजे त्याचा सर्व भार आरोग्याचा (वैद्यकीय) शासन उचलत असते म्हणूनच कॅनडात जवळपास 40 % टॅक्स हा भरावा लागतो.एका सर्वेक्षणानुसार दरवर्षी 30 हजारहून जास्त भारतीय नागरिक कॅनडात आपले नशीब अजमावण्यासाठी येत असतात.
कॅनडा हा सरोवरांचा देश आहे.चार महिने बर्फाच्छादित, मग सरोवर गोठतात त्यावर आईस हाॅकी खेळण्याचा आनंद लुटतात. आईस हाॅकीवर कॅनडाची मास्टरकी आहे.
काही वर्षांपूर्वी कॅनडीयन टी.व्ही.शोमध्ये अमेरिकेतील चंगलवादी जीवनांचे कॅनडावर झालेले परिणाम यावर चर्चा झाली होती त्याचा निष्कर्ष अमेरिकेतील बेधुंद जीवन प्रणालीचा आसर निश्चित पडला आहे.हळुहळु न्यूयॉर्कमधील संस्कृती टोरांटोत येत असल्याचे मान्यवरानी म्हटले आहे.त्यात मार्गाने थॅचर,जपानचे पंतप्रधान, अनेक कलावंत, विचारवंत यांचा समावेश होता.
आता टोरांटो आणि व्हन्कुव्हर या मोठ्या शहरातील समाज जीवन व जीवन शैली याची थोडी तुलनात्मक माहीती घेऊ! टोरांटो हे मोठेच आणि दाट लोकवस्तीचे शहर आहे.जगातील सर्व सुखसोयी येथे हात जोडून तुमच्या सेवेस तत्पर आहेत.येथील आर्थिक स्थिती,साॅक्पटवेअर शिक्षण, वैद्यकीय संशोधन, पर्यटन, क्रीडा क्षेत्रातील भरारी, मनोरंजनाची रेलचेल या हे शहर अग्रेसर आहे.येथील नाइट लाइफ आणखीन रसिकासाठी आर्कषण आहे.दुसरे व्हन्कुव्हर शहर हे सागरी किनारपट्टीवर वसलेले असून निसर्गाची मुक्त उधळण या ठिकाणी झाली.नितांत सुंदर समुद्र किनाऱ्यावर जगातील पर्यटकाची तुफान गर्दी,दुसरीकडे गर्द हिरवीगार पर्वत राजी,सतत वर्षभर पर्यटनासाठी लोकांची यातायात, वर्दल चालूच असते. येथे वनसंपत्तीतून उत्पन्न मिळते,नैसर्गिक बंदर असल्याने व्यापारउद्योगात फायदा होतो.ब्रिटिश कोलंबियात वसलेला या शहरात चीनी लोकसंख्या जास्त आहे.येथील नाइट लाइफ बार,संगीत, मनोरंजनासाठीची सर्व द्वारे रसिकांसाठी सताड उघडी असतात.
मी जपान मधील टोकियो ,ओसाका,चीन मधील बिजींग आणि शांघाय, पॅरिस मधील रंगेल जीवन प्रणाली,तिथला लिडर शोध ,थायलंड, पटाय्या मधील रात्रीची दुनियेत सफर केली आहे. त्याचे अनुभव कथन पुढे करीनच.
लेखक: डॉक्टर भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन












