
कॅनडात येऊन आता आठवडा होत आहे.जेटलाॅग संपून गेला असून आम्ही येथील वातावरणाशी जुळवून घेतले आहे. उषाची आणि माझी कॅनडातील दुसरी भेट! प्रथम आम्ही 2018 येथे आलो होतो तेव्हा कॅनडातील बहुतांशी प्रेक्षणीय स्थळे,प्रमुख शहरे,म्युझियम, सेंट्रूल भव्य ग्रंथालय, इत्यादी भेटी दिल्या होत्याच. काही ठिकाणे आम्ही ट्रॅव्हलर्स टूर्स पाहिली.तो एक विलक्षण अनुभव होता.
माझा मोठा मुलगा राहुल, त्याची पत्नी पारूल आणि आमच्या जुळ्या नाती अवनी आणि नीवा यांना आता कॅनडीयन नागरिकत्व मिळाले आहे. एक वर्षापूर्वी त्यानी भव्य बंगला (4400 चौ.फू.बांधकाम असलेला विकत घेतल्यावर तो आम्ही येऊन पहावे हा त्यांचा आग्रह त्यात अवनी नीवाच्या भेटीची ओढ होतीच.
अमेरिकेतील अन् कॅनडातील घरांची रचना सर्व साधारणतः सारखीच असते. घराच्या पुढील भागाला कोर्टयार्ड म्हणतात.त्याला जोडूनच दोन कार्स राहातील असा गॅरेज, पाठीमागे बॅकयार्ड, तेथे सुंदर लाॅन,काही फळझाडेही असतात. या बॅकयार्ड मध्ये सफरचंद, पेर आणि द्राक्षाच्या वेली आहेत. काही भाजीपाल्याची लागवड केली आहे. माझ्या फार्म हाऊसवरून नेलेली कडीपत्ता,तुळशी,मोगरा,जाई जुई येथल्या मातीशी नाते जोडून आहे. येथे बार्बेक्यूची व्यवस्था केली आहे. सकाळची सोनेरी किरणे अंगावर घेत सनबाथ घेत भीमसेन यांचा स्वर्गीय आवाज ऐकणे ही वेगळीच अनुभूती असते. घराच्या खाली बेसमेंट असते. तेथेही आपल्या मर्जीनुसार रचना केलेली असते. काहीचा बाररूम, ग्रंथालय, संगीत ऐकण्याची तसेच मित्र मंडळीसह मैफल जमविण्याची जागा असते.
आता तळमजला विषयी. भव्य किचन, त्यामध्ये सर्वच आधुनिक सुविधा,डिश वाॅशर,बारस्टूल,बारफ्रीज इत्यादी. दुसरीकडे भव्य लिवींग रूम,त्यात अवनी नीवाचा पियानो,गिटार थोडक्यात संगीत रूमच,दुसर्या बाजूला दहाजण एकाच वेळी भोजन घेतील असा डायनिंग टेबल, तिसर्या दालनात मनोरंजनासाठी होम थिएटर, सोफे आणि बरेच काही.वाॅशींग मशीन, वार्डरोब,स्टोअर रूम,असे बरेच काही.त्यानंतर वरच्या मजल्यावर चार बेडरूम्स,एक आॅफीस रूम, असा पसारा आहे आणि हे सर्व पारूल, राहुलचे श्रमसाफल्य पाहून माझे मन रोमांचित झाले.मुलाच्या कौतुका साठीच ही आमची ट्रीप होती ती सार्थकी लागली अशी माझी मनोभावना आहे.
डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन











