महाराष्ट्र सरकारचा मंत्री मंडळ विस्तार: बहुप्रतिक्षीत मंत्रिमंडळ विस्तारात १८ जणांचा कॅबिनेट दर्जाचे मंत्री म्हणून समावेश.

बहुप्रतिक्षीत मंत्रिमंडळ विस्तारात १८ जणांचा कॅबिनेट दर्जाचे मंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे.

तब्बल ३९ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात १८ जणांचा समावेश करण्यात आला.

मात्र, मंत्रिमंडळात एकाही महिलेला संधी देण्यात आली नसून, विजयकुमार गावित, संजय राठोड आणि अब्दुल सत्तार या वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांचा समावेश झाल्याने नव्या वादाला तोंड फुटले आह़े.

बहुप्रतिक्षीत मंत्रिमंडळ विस्तारात १८ जणांचा कॅबिनेट दर्जाचे मंत्री म्हणून समावेश करण्यात आला.

भाजप आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी नऊ जणांना पहिल्या टप्प्यात संधी मिळाली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्व मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

आमदार अपात्रता, शिंदे सरकारची वैधता याबाबत सर्वोच्च न्यायालयात आणि खरी शिवसेना कोणाची, याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगापुढे प्रलंबित असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारने सावध पवित्रा घेत पहिल्या टप्प्यातील विस्तार केला.

शिवसेनेत बंड करताना शिंदे यांनी आपल्याबरोबर आलेल्या बऱ्याच आमदारांना आणि अपक्षांना मंत्रिपदाचे आश्वासन दिले होते. त्यातील अनेकांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. यातूनच शपथविधी समारंभ सुरू होईपर्यंत मुख्यमंत्री शिंदे यांना आपल्या समर्थक आमदारांची समजूत काढावी लागली.

मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून लगेचच नाराजीचे सूर उमटू लागले तर वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या तीन मंत्र्यांच्या समावेशामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीकाही झाली.

१८ जणांच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेचा समावेश झालेला नाही. याबद्दल विरोधकांनी शिंदे-फडणवीस यांच्यावर टीका केली. पहिल्या टप्प्यात विधानपरिषदेतील आमदारांचा समावेश न करण्याचे ठरविण्यात आले होते, असे सूत्रांनी सांगितले.

मंत्रीपदासाठी दिलेला शब्द पाळला गेला नसल्याचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आह़े शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजीचा सूर उमटला.

राठोड आणि सत्तार यांच्या समावेशाबद्दल आधी अनिश्चितता होती. पण, सत्तार हे पुन्हा शिवसेनेत जाण्याची भीती होती. यामुळेच सत्तार आणि राठोड यांचा समावेश करण्यात आला. संजय शिरसाट, भगत गोगावले आदी काही आमदार संतप्त झाले. मंत्रीपदाचे आश्वासन देऊन ते मिळणार नसेल, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे परत फिरण्याचा इशारा काही नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

भाजपमध्ये काही नेते नाराज असले तरी त्यांनी उघडपणे भूमिका मांडण्याचे टाळले.

नवीन मंत्री मंडळ विस्तारात खालील १८ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.

राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा.