मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत जोरदार पाऊस

मुंबई: मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई सह राज्यात अनेक ठिकाणी काल रात्री पासून जोरदार पाऊस कोसळत आहे. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुंबईच्या विविध भागांत रात्रभर पाऊस पडत आहे. पहाटे पावसाचा जोर अधिकच वाढला आहे. दक्षिण मुंबईसह उपनगरातही सर्वदूर पाऊस कोसळत आहे.

पुण्यातही मंगळवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुणे रेल्वे स्टेशनजवळील रस्ता, एसएनडीटी परिसर, आघारकर रस्ता, कर्वे रस्ता, डेक्कन, कोथरूड येथे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. 

मुंबई शहर व उपनगरात तसेच पालघर, विरार, मिरा-भाइंदर, ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, अलिबाग या भागांत पावसाचा जोर कायम राहणार, अशी शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे तर पुढील दोन तास प्रामुख्याने मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांत विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळेल, असेही हवामान विभागाने नमूद केले आहे.