
*सफर शिकागोतील प्रेक्षणीय स्थळांची…..*
आज काही प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या. प्रत्येकाची रचना आगळी वेगळीच ,तितकीच आकर्षक आणि अप्रतिम!
शिकागो शहराला निर्सगाकडून सौंदर्याचे भरभरुन वरदान लाभले आहे. त्यातील एक म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर होय. या पोर्ट वरून व्यापारी मालाची आयात निर्यात फार मोठ्या प्रमाणात होत असते.सतत हे बंदर गजबजून गेलेले असते.

आम्ही शेडचे मत्स्यालय पाहाण्यास गेलो. तिकीट बुकिंग ऑनलाईन झाली होती.सर्वत्र गर्दीच गर्दी.पण कुठेही गडबड नव्हती.स्वयं शिस्तबद्धतेचा एक उत्तम उदाहरण होते. या मत्स्यालयात 25000 हून अधिक विविध प्रकारचे मासे,1500 प्रजातीचे पक्षी,सागरी सस्तन प्राणी आणि सापांच्या विषारी ,बिनविषारी असंख्य जाती असे हे एकमेव अतिभव्य,जगातील सर्वात मोठे इनडोअर मत्स्यालय आहे. येथेही लाखो पर्यटक भेटी देत असतात. जीवशास्त्राच्या विद्यार्थ्यांना फार मोठी पर्वणीच ठरू शकेल.

संपूर्ण मत्स्यालय पाहून खरोखर दमछाक झाली होती. नकळत किती चालणे झाले तेसुद्धा कळत नव्हते.भूकही लागली होतीच, लंचची वेळही झाली होती म्हणून पोटपूजा करून घेतली.
नौदल घाट शिकागोतील आणखीन एक खास आकर्षण आहे. प्रतिवर्ष किमान 10 लाख लोक येथे भेट देतात.

मिशीगण लेकच्या बाजूने हा घाट पसरलेला आहे. या ठिकाणी अनेक प्रदर्शन केंद्रे ,वनस्पती उद्याने ,रेस्टॉरंट, कॅफे ,शाॅपींग माॅल, मुलांसाठी स्वतंत्र संग्रहालय ज्यामध्ये त्यांच्या बुध्दीला चालना मिळेल आणि शैक्षणिक दृष्टिकोन व्यापक होईल अशी रचना केली आहे. यात टिफनी स्टॅन्ड ग्लासचा समावेश आहे. बच्चे मंडळीसह पालक वर्गाच्या ज्ञानात भर पडत असते.
डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन









