
जपान: जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा युवा खेळाडू बीसाई प्रणितने उपांत्य फेरीत प्रवेश केला. रिओ ऑलिम्पिक रौप्यविजेत्या व पाचव्या मानांकित सिंधूला पुन्हा एकदा अकाने यामागुचीकडून पराभव स्वीकारावा लागला. याशिवाय, पुरुष दुहेरीतही सात्विकराज-चिराग जोडीचे आव्हान संपुष्टात आले. आता, या स्पर्धेत केवळ प्रणीतवरच भारताची मदार असणार आहे.
पुरुष गटात मात्र बीसाई प्रणितने विजयी घोडदौड कायम ठेवताना उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व सामन्यात प्रणितने इंडोनेशियाच्या 18 व्या मानांकित टॉमी सर्जिटोवर 21-12, 21-15 असा विजय मिळवला. 36 मिनिटे चाललेल्या या सामन्यात प्रणितने शानदार खेळाचे प्रदर्शन साकारले. आता, उपांत्य फेरीत प्रणितची लढत जपानचा दिग्गज खेळाडू केंटा मोमोटाशी होईल.










