
नवी मुंबई महानगरपालिका दि.17 ऑगस्ट रोजी, सकाळी 11 वा. ‘समूह राष्ट्रगीत गायन’ उपक्रमात सहभागी होण्याचे नमुंमपा आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे आवाहन.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “स्वराज्य महोत्सव” अंतर्गत राज्य शासनाच्या आदेशानुसार दिनांक 17 ऑगस्ट रोजी, सकाळी 11 वा. समूह राष्ट्रगीत गायन उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये खाजगी, शासकीय तसेच इतर सर्व प्रकारच्या शाळा / महाविद्यालये / शैक्षणिक संस्था / विद्यापीठे यामधील विद्यार्थी, शिक्षक यांचा सहभाग अनिवार्य असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांनीही या उपक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याचे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दि.9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट, 2022 या कालावधीमध्ये ‘स्वराज्य महोत्सव’ सुरू आहे. या अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत लोकसहभाग घेत रॅली, सांस्कृतिक व क्रीडा विषयक उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आले. तशाच प्रकारचा समूह राष्ट्रगीत गायन हा उपक्रम दि.17 ऑगस्ट रोजी, सकाळी 11 वाजता करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत.
त्यानुसार (१७ ऑगस्ट २०२२) सकाळी 11 वा. एकाच वेळी नागरिकांनी आहे त्या ठिकाणी स्तब्ध उभे राहून राष्ट्रगीत गायन करायचे आहे. सकाळी 11.00 ते 11.01 या एका मिनिटांमध्ये राष्ट्रगीत गायन करणे अपेक्षित आहे, याची सर्व संबधितांनी दक्षता घेण्याच्याही सूचना करण्यात आलेल्या आहेत.
समूह राष्ट्रगीत गायनाच्या वेळी जाणते-अजाणतेपणे राष्ट्रगीताचा अवमान होऊ नये, याची सर्वांनीच दक्षता घेणे तसेच खाजगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, संस्था, शासकीय व निम शासकीय कार्यालये, केंद्र शासन व राज्य शासनाशी संबंधित कार्यालयातील अधिकारी/ कर्मचारी यांनीही या उपक्रमात सक्रीय सहभाग घेणे अपेक्षित आहे.
राष्ट्रगीत गायनासाठी विद्यार्थ्यांनी मोकळे पटांगण, वर्ग खोली, किंवा हॉल या ठिकाणी एकत्रित उपस्थित रहावे. तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभागी व्हावे अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.
तरी *नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, नागरिक यांनी दि.17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता समूह राष्ट्रगीत गायन उपक्रमात उत्साहाने सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.






