
वर्ल्डकपच्या पाकिस्तान विरुद्धच्या थरारक सामन्यात भारतानं 4 गडी राखून विजय मिळवला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली होती. पण एक चेंडू एक धाव आवश्यक असताना आर. अश्विननं एक धाव काढली आणि विजयावर मोहोर उमटवली.
भारत आणि पाकिस्तानमधील थरारक सामन्यामध्ये पाकिस्तानचा पराभव झाला. भारताने हा सामना 4 विकेट्सने जिंकला आणि आशिया कपमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा भारताने काढला. वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात भारताकडून झालेला पराभव चांगलाच जिव्हारी लागला आहे.
मेलबनच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात (India Vs Pakistan) भारताने पाकिस्तानचा 4 गडी राखून धुव्वा उडवला. भारताचा स्टार फलंदाज (Virat Kohli) विराट कोहलीने 82 धावांची वादळी खेळली आणि अखेरच्या षटकात भारताला विराट विजय मिळवून दिला आहे.
विराटच्या (Virat Kohli) या अफलातून खेळीमुळे विराटचं जगभरातून कौतूक होताना दिसत आहे. अनेक दिग्गज खेळाडूंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विराटचं कौतूक केलंय.
दरम्यान, विराटने 82 धावांची वादळी खेळी केली. फक्त 53 चेंडूत विराटने पाकिस्तानच्या गोलंदाजांना नाचवलं. त्यात त्याने 6 चोकार तर 4 मॅचविनिंग षटकार देखील खेचले आहेत. नवोदित अर्शदीप सिंग यांनी गोलंदाजीत चमक दाखवून पाकिस्तानचे तीन खंदे फलंदाज बाद केले. यात पाकिस्तानी फलंदाज आणि कप्तान बाबर आझामाचा सुद्धा समावेश होता. बाबर आझामाला भोपळाही फोडता आला नाही. हार्दिक पांड्याने अष्टपैलू खेळ दाखवून भारताचा विजय सुकर केला. पंड्याने गोलंदाजी करताना तीन बळी घेतले आणि फलंदाजी करताना विराट कोहली सोबत महत्त्वाची शतकीय पार्टनरशिप केली.
शेवटच्या चेंडू पर्यंत सामना रंगला होता आणि अगदी शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानच्या हातातोंडाशी आलेला विजय खेचून आणला. विराटच्या या विराट खेळीने भारताला विजयी सुरूवात करून दिली. पाकिस्तानवरील या विजयाने संपुर्ण देशात एक दिवस अगोदर दिवाळी साजरी करण्यात आलेली पाहायला मिळाली.











