
प्रभात म्हणजे फक्त पहाट नाही तर दिवसाची नयनरम्य सुरुवात. प्रभात संस्थेचे उद्दिष्टंच ‘हट के’ कार्यक्रम आयोजित करण्याचे आहे, मग ते दुर्गम भागात केलेले रक्तदान शिबीर असो किंवा लहान मुलांसाठी आयोजित फनफेयर असो, असाच एक आगळावेगळा कार्यक्रम दिवाळीचे औचित्य साधून चौकाळा गावपरिवारात शनिवार, २२ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता.
दीपावली म्हणजे प्रकाशाचा सण. जसा आजूबाजूचा परिसर रोषणाईने दिपून निघतो तशीच मनंही उजळून निघत असतात आणि म्हणूनच स्वच्छतेच्या प्रकाशाने आपले जीवन उजळवणाऱ्या आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित अशा ‘स्वच्छतादूत’ बांधवांचा सन्मान करण्याचे ‘प्रभात’ संस्थेने ठरवले.
शनिवारी संध्याकाळी पार पडलेल्या ह्या कार्यक्रमात १३ स्वछता दूतांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. रोज येऊन कचरा उचलून नेणे, परिसराची सफाई करणे अशी कामे ते त्यात खंड पडू न देता करत आहेत, त्यांच्या ह्या कामाविषयी ऋण व्यक्त करण्याचा उदात्त हेतू हा सोहळा आयोजित करण्यामागे होता. संस्थेचे अध्यक्ष ख्रिस्तोफर रिबेलो ह्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच स्वागत प्रास्ताविक केले, गावातील कार्यकर्ते जॉन टी. परेरा ह्यांनी गावच्या वतीने आभाराचे दोन शब्द उद्धृत केले, उपाध्यक्ष नितीन रिबेलो ह्यांनी आभार प्रदर्शन केले. आमच्या आयुष्यातील हा पहिलाच सन्मान होता अशा भावना सत्कारमूर्तींनी व्यक्त केल्या. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी खजिनदार मिल्टन परेरा व सचिव फ्रँकसन परेरा ह्यांनी विशेष मेहनत घेतली.











