भाजपात आज मेगा भरती

मुंबई: निवडणूक जवळ येत आहेत तसे भाजपात जोरदार इनकमिंग सुरु आहे. ज्यांना जनतेने नाकारले होते त्यांनाच सोबत घेऊन भाजपा येणाऱ्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणूक लढविणार आहे असं वाटतं.

शिवेंद्रसिंहराजे भोसले, चित्रा वाघ, मधुकरराव पिचड आदी मंडळी भाजपात प्रवेश करणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज नवी मुंबईतील वजनदार नेतृत्व गणेश नाईक हे देखील आज राष्ट्रवादीला सोड चिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश करणार आहेत. कालच त्यांचे पुत्र आणि ऐरोली विधानसभा आमदार संदीप नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे पक्ष सोडण्याचे सत्र सुरूच असून, मंगळवारी राष्ट्रवादीचे अकोले येथील आमदार वैभव पिचड, सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, ऐरोलीचे आमदार संदीप नाईक आणि काँग्रेसचे वडाळा येथील आमदार कालिदास कोळंबकर यांनी आपल्या आमदारकीचे राजीनामे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केले. या चार आमदारांसह राष्ट्रवादीचे माजी मंत्री गणेश नाईक आज, बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

आमदार संदीप नाईक राजीनामा सादर करताना

आज, बुधवारी गरवारे क्लब येथे या आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत या आमदारांसह गणेश नाईक तसेच नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतील. त्यामुळे भाजपासाठी जणु आजचा दिवस हा मेगा भरतीचा म्हणावं लागेल.