
ललित साहित्यातील लेखन स्वातंत्र्य आणि प्रत्यक्षातील वस्तुनिष्ठ इतिहास
जगभरातील सर्व भाषेतील सर्वच साहित्याचे अवलोकन केल्यास ललित साहित्य आणि इतिहासाचे अतूट असे विलक्षण नाते असल्याचे आपणांस दिसून येईल. या लेखकांनी इतिहासातील लोकप्रिय व्यक्तीची जनमानसात वसलेली प्रतिमा घेऊन त्याला आजच्या संदर्भाची फोडणी देऊन भरपूर पोएटिक लिबर्टी घेऊन रंगविलेली असते त्यामुळे मूळ इतिहास बाजूलाच राहातो व कल्पनेने सजविलेला, अतिरंजित कथानक मनोरंजक, मनोवेधक पध्दतीने सादर केल्याने सर्वसामान्यांना तोच खरा इतिहास वाटू लागतो.
अशा प्रकारे प्रचलित झालेल्या संवेदनशील इतिहासाबद्दल कोणी ऐतिहासिक कागदपत्रांतील अव्वल साधनांच्या आधारे सत्य इतिहास समजून सांगण्याचा प्रयत्न केल्यास तो रोषास बळी पडतो. तरीही इतिहास संशोधकांनी नो डॉक्युमेंट नो हिस्टरी या मुलभूत तत्त्वानुसार वस्तुनिष्ठ इतिहासाचे सादरीकरण करावयास पाहिजे.
सेतुमाधवराव पगडी याविषयी म्हणतात कि इतिहास संशोधकास तीन प्रश्नाची उत्तरे द्यावी लागतात, कोणती घटना घडली? ती कशी घडली? आणि ती का घडली? प्रामाणिक संशोधक ऐतिहासिक साधने आणि पुरावे यांचा सखोल अभ्यास करून योग्य तो तारतम्य राखून आपले निष्कर्ष नोंदवून ठेवतो.
आजच्या या लेखातून पेशवाईतील काही घटनांवर थोडक्यात चर्चा करून इतिहासाचे विकृतीकरण करण्यास आम्हीच कसा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हातभार लावला आहे हे लक्षात येईल.
पहिल्या बाजीरावाच्या पराक्रमाकडे दुर्लक्ष करून फक्त मस्तानीच्या प्रेमप्रकरणावरच अनेक पृष्ठे खर्ची घालवायची? घाशीराम ही व्यक्तीरेखा घेऊन नाना फडणवीसाचे राजकीय चातुर्य संपूर्ण डोळ्याआड करायचे? रावबाजीच्या स्रिलंपटत वृतीकडे दुर्लक्ष करून तो कसा रसिक होता याचीच वर्णनात्मक स्तुती करायची? असो अशी अनेक उदाहरणे देता येतील. विस्तार भयामुळे थांबतो.
मराठीत आजवर ऐतिहासिक विषयावरील कथा , कादंबर्या, नाटके, चित्रपट यातून अपुर्ण माहीतीवर शब्दांचे फुलोरे फुलवून कल्पनेचा तिखट मसाला घालून आपल्या इतिहासाचे सादरीकरण झाले आहे त्यामुळेच आपण संभ्रमित झालो आहोत इतकेच नव्हेतर आपण या काल्पनिक इतिहासालाच खरा इतिहास समजत आलो आहोत. हा ह्यष्टीकोन बदलला पाहिजे. भाग 1 ( समाप्त)
डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन मोबाईल 835 595 7451











