डॉ भास्कर धाटावकर लेखमाला: पुणे पुराभिलेखागाराची निर्मीती व त्याची खास वैशिष्ट्य – भाग 7

पुणे पुराभिलेखागाराची निर्मीती व त्याची खास वैशिष्ट्य

थोरल्या बाजीरावाने आपल्या पराक्रमानी इतिहासात नाव अजरामर केले आहे हे सर्वज्ञात आहेच त्यांनीच 1729 मध्ये पुण्यात शनिवारवाडा बांधून तेथेच स्वता:च्या कारकीर्दीची ग्वाही देण्यास सुरुवात केली.या थोरल्या बाजीरावाने सर्व दप्तरे शनिवारवाड्यात आणली. 1764 — 1796 पर्यन्त सदरचे पेशवे दप्तर नाना फडणवीस यांच्या नानावाड्यात खुद्द नानाच्या देखरेखीत ताब्यात होती. तर पुढे दुसर्‍या बाजीरावाच्या कारकीर्दीत पुन्हा हा दप्तरखाना शनिवारवाड्यात आले.

1818 ला पेशवाई अस्त पावली. धूर्त इंग्रजांनी शनिवारवाड्यावरील स्वराज्याचा भगवा ध्वज एका गानू नावाच्या व्यक्तीच्या हातून खाली उतरून मराठी अस्मितेचेच नाक कापून दाखविले.

पुढे इनाम कमिशन स्थापन झाल्यावर रेकॉर्ड मध्ये वाढ झाली होती. या सर्व अभिलेखांची सुव्यवस्थितपणे जतन करण्यासाठी गव्हर्नर एल्फिन्स्टन यानी 1 ऑगस्ट 1887 समिती स्थापन केली व तिच्या मार्गदर्शनानुसार 1891 साली खास अभिलेखांसाठी सध्याच्या पुणे कौन्सिल हाॅलसमोर भव्य अशी वास्तुशास्त्राचा सुंदर दगडी इमारत दिमाखात उभी राहिली.( या इमारती व तिच्या खास वैशिष्ट्याविषयी माझ्या महाराष्ट्रातील शासकीय पुराभिलेखागारांची निर्मिती आणि कार्य या पुस्तकातील पृष्ठ 50 ते 64 पुणे पुराभिलेखागाराची निर्मिती व वैशिष्ट्ये या लेखात विस्तृत तपशीलवार माहीती दिली आहे. )

या पुणे पुराभिलेखागारात 1590 पासूनचे जुने मोडीलिपीतील अभिलेख असून त्यांचे वैशिष्ट्ये सांगावयाचे झाल्यास, ” एका लिपीतील, एका भाषेतील, एका राजवटीची, एका राज्याचा इतिहास सांगणारी 1590 ‐- 1865 सुमारे दोनशे पन्नास वर्षांची ऐतिहासिक कागदपत्रे इतिहास संशोधकांची प्रतिक्षा करीत आहेत.

येथे इनाम कमिशनचे सर्वच पेपर्स वादी व प्रतिवादीकडील जमा असून त्यात कमिशनचे निवाडेही समाविष्ट असल्याने ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. या कागदपत्रांद्वारेच इनाम जमीनीविषयक गुतांगुतीचे जटिल प्रश्न सोडविण्यास मदत होते.

मराठा साम्राज्याने अटकेपार भगवा फडकविला होता त्या निरनिराळ्या प्रदेश संबधित कागदपत्रे, शिवाजीमहाराज, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही ही कागदपत्रे आपले अंतरंग उलगडून दाखविण्यास उत्सुक आहेत.

अशा प्रकारे पुणे पुराभिलेखागार ऐतिहासिक बाबतीत महत्त्वाचा खजिना आहे. ते तुमच्या इनामी जमीनीविषयक हक्काचे रक्षण करण्यास समर्थ आहेत.

डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन. मोबाईल 835 595 7451

Dr Bhaskar Dhatavkar
Dr Bhaskar Dhatavkar