डॉ भास्कर धाटावकर लेखमाला: ललित साहित्यातील इतिहास लेखन आणि वस्तुनिष्ठ इतिहास (भाग 2) – भाग 8

ललित साहित्यातील इतिहास लेखन आणि वस्तुनिष्ठ इतिहास (भाग 2) – भाग 8

इतिहास हा केवळ कल्पनेवर अथवा तर्कावर आधारित लिहीला जाऊ शकत नाही ह्या वस्तस्थितीचे भान प्रत्येक संशोधकानी, इतिहासाचे लेखन करणारानी लक्षात ठेवून लेखन करावयास पाहिजे. इतिहासात घडून गेलेल्या घटनेचा , राजवटीचा अथवा विशिष्ट असा कालखंड घेऊन इतिहास लिहिताना नवीन माहिती किंवा घटनेवर प्रकाश टाकताना अस्सल कागदपत्रांद्वारेच तत्कालीन परिस्थितीवरील इतर समकालीन ऐतिहासिक साधनांचा वापर करून कोणतेही अभिनिवेश न बाळगता तटस्थ राहून व तारतम्य राखूनच वस्तुनिष्ठ इतिहास लिहीला पाहिजे.

महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदारांनी म्हटले आहे कि, ” एक अस्सल ऐतिहासिक कागदाचा चिटोरा दहा बखरीपेक्षा लाख मोलाचा असतो. आणि आपण तर बखरींचाच आधार घेऊनच आपल्या कथा, ऐतिहासिक कादंबर्‍या मग त्यावरील नाटके, चित्रपट कल्पनेच्या पंखावर स्वार होऊन वाटेल तशी पोएटिक लिबर्टीचा आधार घेऊन इतिहासाचे सादरीकरण केले आणि हाच आमचा खरा इतिहास आहे असे समजून राहिलो.

या बखरकारानी सर्वात विकृत चित्रण छत्रपती संभाजी महाराजांचे केले. ज्यानी नऊ वर्षांत तीन तीन शत्रूशी 120 लढाया केल्या त्यात एकदाही हार पत्करली नाही, एकही किल्ला गमावला नाही, 1685‐- 1687 मध्ये पडलेल्या भयाण दुष्काळात शेतकऱ्यांना भरीव मदत देऊन सावरले , राजदरबारातील कामाना विलंब होऊ नये म्हणून महाराणी येसूबाईना सखी राजयज्ञी असा शिक्का देऊन प्रशासकीय संधी दिली त्या पराक्रमी शिवपुत्राची चुकीची व्यक्तीरेखा सादर करण्यात आली. हा सर्व चुकीचा इतिहास खोडून काढण्यासाठी कागदपत्रांद्वारेच मदत झाली.

संभाजी महाराजांनी सोयराबाईला भिंतीत चिणून ठार मारले असे सांगितले गेले पण प्रत्यक्षात सोयराबाई मृत्यू 31 ऑक्टोबर सन 1681 सालीच नैसर्गिकरित्या झाल्याचे पुरावेच थोर इतिहासकार त्रं.ब.शेजवळकरांनी शिवचरित्राची साधने या ग्रंथात नमूद केले आहे. त्यांच्या जीवनात गोदावरी, थोरातांची कमळा अशी प्रकरणे झालीच नाहीत पण कल्पनेची भरारी मारणाऱ्यांना शेवटी ऐतिहासिक दस्तावेजांनीच रोख लावला हीच त्या कागदपत्रांची खरी ताकद आहे.

शिवचरित्रातही अशा अनेक भ्रामक गोष्टीचा भरणा झाला होता तो दूर करण्यात हे दस्तावेजच उपयोगी पडले आहेत. एकच घटना सांगतो, ” शिवाजीमहाराजांनी भवानी तलवार ही 1658 मध्ये महाड कडील गोविलकर सांवतांकडे भेट दिली असता त्यांनी ही पोर्तुगीज बनावटीची दुधारी तलवार जिच्यावर IAS असे शब्द कोरलेले होते ती तलवार सांवत भेट म्हणून देऊ पाहत होते पण महाराजांनी 300 होन देऊन विकत घेतली आणि तिलाच भवानी असे नाव दिले.ही हकिकत सातारचे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या मोडीलिपीतील डायरी पृष्ठ क्रमांक 233/234 त्यांनीच 1826 मध्ये नोंदवून ठेवलंय.

मराठ्यांच्या इतिहासात औरंगजेबची पन्नास वर्ष खर्ची पडले. शहाजी, शिवाजी, संभाजी, राजाराम, आणि शाहू या चार पिढ्यांशी वैरभाव धरून त्यांनी संघर्ष केला.या धर्मांध औरंगजेबला इनामदारांनी भरपूर जैनाबाबी या नर्तकी बरोबर प्रणय करावयास लावले. तिला घृष्णेश्वराच्या मंदिरात अभिषेक करावयाचा होता पण पुजारीने अडवल्यावर औरंगजेब मंदिर तोडायलाच जातो असे कथानक रंगविलेले आहे! आता एक मुस्लिम नर्तकी अभिषेकाची अभिलाषा धरते आणि तिच्यासाठी औरंगजेब क्रोधित होतो असे हास्यास्पद वर्णन करण्यात काय हशील आहे? पण ते कादंबरीकार करू शकतात. या सर्वाचे खंडन अभिलेखच करू शकतात म्हणून राष्ट्रीय जीवनात ऐतिहासिक अभिलेखांना अन्यन महत्त्व आहे.

डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन मोबाईल 835 595 7451

Dr Bhaskar Dhatavkar
Dr Bhaskar Dhatavkar