डॉ भास्कर धाटावकर लेखमाला: राष्ट्रीय जीवनात अभिलेखांचे महत्त्व या लेखमालेच्या सांगता करणारा अखेरचा लेख……- भाग 21 (समाप्त)

राष्ट्रीय जीवनात अभिलेखांचे महत्त्व या लेखमालेच्या सांगता करणारा अखेरचा लेख……

इतिहास प्रेमी मित्र , मैत्रिणी गेल्या वीस लेखातून मी राष्ट्रीय व वैयक्तिक जीवनात अभिलेखांचे महत्त्व विशद करण्याचा प्रयत्न केला आहे.

हे अभिलेख निर्णायक निर्णय घेण्यास कसे उपयुक्त ठरतात ते उदाहरणासहित चर्चा केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेखागारात मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, आणि औरंगाबाद आता छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचे अभिलेख कोणत्या सालातील आहेत, त्यांचे विषय, मोडीलिपीतील कागद, मुंबईतील वृत्तपत्राची माहिती देऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

मी शालेय जीवनापासून इतिहास विषयात करीयर करण्याचे ठरविल्यावर त्या अनुषंगानेच वाटचाल करीत राहिलो. पुण्यात भारत इतिहास संशोधन मंडळात मुळचे पनवेलचे इतिहासाचार्य ग.ह.खरे यांचे मार्गदर्शन मिळत गेले. अलिबागच्या जे.एस एम. काॅलेज मधील डाॅ.अरविंद वामन कुलकर्णी सरांनी वाचनाची गोडी वाढविली . अखेर अलिबाग काॅलेजची नोकरी सोडली. पुढे माझी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पुराभिलेखागारात सहाय्यक संचालक पदावर नेमणूक झाल्यावर सतत अभिलेखांशी संबंध येऊ लागला. रिर्सच स्काॅलर भेटू लागले. नामंवत इतिहासकारांच्या भेटीतून त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून कणाकणाने अभिलेख हा विषय डोक्यात भिनत गेला.1980 ते जून 2011 पर्यंत मला पुराभिलेखागारात सेवा करण्याची संधी मिळाली. अनेक नवीन उपक्रम राबविण्यात आले. सर्व सामान्य जणांना अभिलेखांची माहीती होण्यासाठी दुर्मीळ कागदपत्रे व छायाचित्रांची प्रदर्शन आयोजित केली.अगदी भारताच्या राजधानीत स्वर्गीय इंदिराजी यांच्या जीवनावरील प्रदर्शन आयोजित केले.मोडलिपी प्रशिक्षण वर्ग, अभिलेख व्यवस्थापन शास्त्रावर लेख सर्वच विद्यापीठातून तसेच जिल्हा कार्यालयात व्याख्याने दिली, पुराभिलेखागारावर चौदा मिनिटांची डॉक्युमेंटरी देशात सर्व प्रथम मी तयार करून घेतली.तिची संहिता मी लिहीली.शासकीय कार्यालयातील रेकॉर्ड रूम तपासणी मोहीम राबवून त्यातूनच पब्लिक रेकॉर्ड कायदा पारीत करून घेतला.अभिलेखांचे सूक्ष्म चित्रीकरण सुरू केले.अशा अनेक आधुनिक सुविधा विभागात आणण्याचा सतत ध्यास घेऊन ते प्रत्यक्षात साकार केले. या साठी माननीय शासकीय यंत्रणेतील सर्वानीच मोलाची मदत केली.

आणि म्हणूनच या अभिलेखांचे महत्त्व विशद करण्याची कल्पना सुचली आणि युवा प्रगतीचे अभ्यासू संपादक श्री किरण राणे यांनी उचलून धरली व सलग वीस लेखातून प्रसिद्ध केली. त्यामुळेच मला आपणासमोर व्यक्त होता आले.अनेक मित्रांनी त्याचे कौतुक केले, काहीनी महत्त्वपूर्ण सुचनाही केल्या.या सर्वाचेच मनःपूर्वक आभार मानून या लेखमालेचा समारोप करीत आहे.

डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन  मोबाईल 835 595 7451

Dr Bhaskar Dhatavkar
Dr Bhaskar Dhatavkar