मनोज जरांगेंचा लढा यशस्वी,राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या !

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील लढ्याला आज अखेर यश मिळालं आहे. नवी मुंबईतील वाशीमध्ये मराठ्यांचा मोठा जल्लोष बघायला मिळत आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे. लढा यशस्वी झाल्यामुळे वाशीमध्ये मराठा आंदोलकांकडून मोठी घोषणाबाजी आणी जल्लोष साजरा केला जात आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या विजयी रॅली सध्या सुरु आहे.

मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाचा मनोज जरांगे पाटील यांचा प्रदीर्घ लढा संपला. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली. शेवटी मिळवले की नाही, दाखवले की नाही करुन…अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आणि विरोधकांना चोख उत्तर दिले. मिळू देणार नाही. कसे मिळू देणार नाही. मिळवले की नाही. सगे सोयऱ्यांचा अध्यादेश निघाला की नाही, असे शाब्दीक फटकारे मनोज जरांगे पाटील यांनी कोणाचे नाव न घेता लगावले.

मराठा आंदोलनाचा संघर्ष हा मोठा आहे. हे मराठ्यांचे यश आहे. हा मराठ्यांचा विजय आहे. या यशासाठी मराठा समाजाने खूप यातना सहन केल्या. काय माकडे खूप काही म्हणत होते. सगे सोयरे शब्द करता येणार नाही. काही जणांनी माझे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न झाला. ट्रॅपचा प्रयत्न झाला होता. खूप त्रास सहन केला. आरक्षण आंदोलनासाठी अनेक जण कारागृहात गेले. आंदोलनासाठी अनेकांचे बलिदान झाले. अखेर यश मिळाले. यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्र आनंद साजरा करत आहे.

सरकारने शिंदे समितीला मुदतवाढ देण्याची मागणी मान्य केली. कुणबी नोंदी चार लाख जास्तीच्या मिळाल्या. मराठवाड्यासाठी गॅझेट निघाला. खूप वर्षानंतर यश मिळाले. आता संपूर्ण महाराष्ट्र आनंद साजरा करणार आहे. सर्वांचा फायदा होणार नाही. सगे सोरये शब्दासाठी रात्री दोन वाजेपर्यंत खलबते झाले. अखेर आमच्या वकिलांच्या टीमने सर्व मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय झाला.

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी एक मराठा लाख मराठा ही संकल्पना प्रत्यक्षात उतरून दाखवली. मनोज जरांगे पाटील यांच्या ऐतिहासिक लढ्याला अखेर यश प्राप्त झालेय. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या बलिदानाला आज खऱ्या अर्थाने मनोज रंगे पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली आहे, अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी दिली.

मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण आंदोलनाला यश आल्यानंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. या निर्णायनंतर ओबीसी नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांनी तर आजचे सर्व दौरे रद्द केले आहेत. तसेच उद्या त्यांनी मुंबईत त्यांच्या निवासस्थानी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत भुजबळ काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ओबीसी समाजाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शासकीय बंगल्यावर उद्या संध्याकाळी ओबीसी समाजातील नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यांनी या बैठकीला राज्यातील सर्व ओबीसी नेत्यांना पाचारण केलं आहे. तसेच एससी, एसटी आणि एनटी समाजातील नेते आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनाही बैठकीला बोलावलं आहे. छगन भुजबळ यांनी ही तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. भुजबळ उद्या काय निर्णय घेतात? भुजबळांच्या बंगल्यावर काय राजकीय खिचडी शिजते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.