
माझ्या आयुष्यात मी अनेक निरोप समारंभ पाहिले. अनेक समारंभात भाषणाचा योग आला. पण दोन निरोप समारंभ माझ्या कायम स्मरणात राहतील, असे नेत्रदीपक झाले. पहिला निरोप समारंभ झाला, तो सन १९९९ साली. आमच्या अध्यापक विद्यालयाच्या तत्कालीन प्राचार्या आदरणीय श्रीमती विजया ओवळेकर मॅडम यांचा. ज्या निरोप समारंभाला माजी विद्यार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवर यांची अलोट गर्दी लोटली होती. त्यावेळी कार्यक्रमात प्रत्येकाच्या नजरेत मला श्रीमती ओवळेकर मॅडम यांच्या कार्यकर्तृत्वाची, आपलेपणाची व कृतज्ञतेची छटा दिसली होती.

मी पाहिलेला दुसरा नेत्रदीपक निरोप समारंभ मी नुकताच गेल्या ३१ जानेवारीला अनुभवला. तो निरोप समारंभ होता, माझा मित्र आणि कळंबोली शाळेचा मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख श्री. हिराचंद जनार्धन पाटीलचा. आमची भेट तब्बल ४० वर्षांनी म्हणजे एप्रिल २०२३ ला आमच्या बॅचच्या ‘गेट टूगेदर’ला झाली होती.

सन १९८८ साली कर्जत तालुक्यातील एका आदिवासी पाड्यात सुरु झालेले हिराचंदचे ज्ञानदानाचे कार्य ३१ जानेवारी २०२४ पर्यंत चालूच होते. आता तो पनवेल महानगरपालिका हद्दीतील कळंबोली शाळेवर मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख होता. आमची ‘एस. एस. सी’ची १९८२ सालची बॅच. गेल्या चाळीस वर्षात हिराचंदने किती माणसे जोडली आहेत याचा प्रत्यय मला त्या कार्यक्रमात आला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर कमालीची कृतज्ञता मला दिसत होती. माजी विद्यार्थी, सहकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या मनोगतातून मला माझ्या या मित्राच्या कार्यकर्तृत्वाची महती कळत होती. सहकारी तर हिराचंदला ‘दादा’ या आदरयुक्त संबोधनाने बोलत होते. त्या हॉलमधील अनेकांचे डोळे पाणावलेले मी पाहिले.

हिराचंद मला कमालीचा हळवा आणि कुटुंबवत्सल वाटला. हिराचंदच्या लेकीने व्यक्त केलेले मनोगत ऐकून, त्या हृदयस्पर्शी शब्दांनी अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. बाप आणि लेकीचं हळवं नातं तिने अप्रतिम शब्दात व्यक्त केले. हिराचंदने आपल्या आयुष्यभराच्या यशाचे श्रेय आपले आई-वडील, आपली अर्धांगिनी, मोठा बंधू आणि सामान्य नागरिकांना दिले. अनेकांच्या मनोगतातून मला हिराचंदचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य लक्षात आले. ते त्यांनी कळंबोली गावात शाळा बांधण्यात त्याचा सिहाचा वाटा होता. शाळेतील लहान मुलांचा आपलेपणा उपस्थितांना विशेष काही सांगून जात होता. प्रशासकीय अधिकारी श्री. मोहिते सरांच्या भाषणाने हिराचंदच्या कार्याचे अचूक मूल्यमापन केले. एका सहकारी शिक्षकांनी हिराचंदच्या नावाच्या आद्याक्षराची छान कविता लिहून आणली होती की त्या कवितेतून हिराचंदचे विविध पैलू दिसून आले. हिराचंद हा कगरच हिरा होता हे स्पष्ट झाले होते.

भगवे फेटे घालून लेझीमच्या गजरात निरागस विद्यार्थी आपल्या लाडक्या मुख्याध्यापकांना वाजत गाजत निरोप देत होते. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा, म्हणून हिराचंदच्या सहकाऱ्यांनी कमालीची मेहनत घेतलेली दिसत होती. कार्यक्रमानंतर अनेकांनी माझ्या या मित्राबरोबर फोटो काढले. मला देखील त्याच्याबरोबर फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. आयुष्यभर केवळ मुलांच्या हिताचा, समाजाचा विचार केल्यावर माणसाला किती उदंड प्रेम मिळतं हे हिराचंदच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने मी अनुभवलं. हिराचंदने प्रत्येकाला एक रिटर्न गिफ्ट दिले. त्याने प्रत्येकाला एक ‘फोल्डर फाईल’ भेट दिली. कार्यक्रम वेळेत पार पडला. सर्वांनी आमच्या या मित्राला नमस्कार करून आपापल्या घराचा रस्ता धरला. तेव्हा एक वाक्य आठवले ” जेथे कर्तृत्वाची प्रचिती तेथे कर माझे जुळती ” तुझ्या शैक्षणिक व सामाजिक कार्याला शतशः सलाम !
हिराचंद ! तुझ्या कार्याची पोचपावती आम्ही अनुभवली. तुला दीर्घायुरारोग्य लाभो, तुझी पुढील सर्व स्वप्न पूर्ण होवोत, यासाठी खूप खूप शुभेच्छा.
– प्रा. विलास गोपाळ पाटील,
माजी, प्रभारी प्राचार्य
अध्यापक विद्यालय, श्री. समर्थ व्यायाम मंदिर










