कांगारूंच्या देशात: डॉ भास्कर धाटावकर यांच्या लेखणीतून सफर ऑस्ट्रेलियाची – भाग 2

वीणा वर्ल्डच्या टूर इनचार्जने आम्हास छत्रपती शिवाजीमहाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर टर्मिनल दोनवर वीणा वर्ल्ड टूरच्या बॅनर जेथे फडकत असेल तेथे दुपारी चार वाजता ग्रुप लिडर जवळ एकत्रित जमा होण्याच्या सुचना अगोदरच दिल्या जात होत्या. त्याप्रमाणे सर्वजण उत्साहात एकत्र जमत असत. ही सर्वात एकत्र येण्याची सोयीस्कर पध्दत वाटत असे. सुरूवातीस सर्वच अनोळखी मात्र विणा वर्ल्डच्या बॅनर जवळ आले कि एकमेकांना सस्मित चेह-याने अभिवादन करीत आणि नांव, गांव कुठले अशी जुजबी चौकशी करून आपली उस्तुकता काही प्रमाणात पूर्ण करीत असू. पण आजच्या ऑस्ट्रेलियन टूरच्या मॅनेजरनी आम्हांस थेट छत्रपती शिवाजीमहाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर टर्मिनल दोनवर कोलंबो एअरवेजच्या काऊंटरवर जमावे असे कळविले होते.

आज रविवार असल्याने आम्हांस विमानतळावर सोडण्यास स्वतः चेतन आला होता. आमचा नातू रोनित त्याचवेळेस शांत झोपी गेल्याने त्याला आणणे रद्दच झाले. आम्ही बाहेर कुठेही फिरावयास निघालो कि रोनितच्या लागलीच लक्षात येते तेव्हा त्याच्या चेहर्‍यावरील आनंदित भाव पाहाण्यासारखे असतात. तो बाहेर फिरावयास जाण्यास नेहमीच उत्साही असतो.

पुर्वी वीणा वर्ल्डचा बॅनर हातात घेऊन ग्रुप लिडर टर्मिनल दोन जवळ उभा असे आणि तेथेच सर्वानी धावती एकत्रित जमावे अशा सुचना देत असत. पण आज आम्हांस थेट आत मध्ये कोलंबो एअरवेच्या काऊंटरवर बोलावले होते. चेतननी दोन ट्रॉली घेऊन माझी आणि उषाची बॅगा व्यवस्थित ठेवून आम्हांस  गेटपर्यंत सोडले. आठवणीने सेल्फी काढून फेसबुकवर पोस्टही टाकली. तसेच नातेवाईक, मित्र मंडळींबरोबर आमच्या ऑस्ट्रेलियन भेटीच्या प्रस्थानाची बातमी प्रसारित केली. या समाज माध्यमाची ताकद किती प्रभावी आहे याची पुन्हा नव्याने जाणीव झाली. क्षणभर आपणही वलयांकित साहेब झाल्यासारखे वाटून गेले.

आमच्या टूरचा इनचार्ज साईनाथ बरडेनी तशी 16. 10. 24 च्या पोस्टनी कळविले होते. त्यात सोबत घ्यावयाचे महत्वाचे पासपोर्ट, कपडे, औषधे त्यांच बरोबर मोठी बॅगेत तेवीस किलोची वजन मयार्दा , तर हँडबॅगेची वजन मयार्दा सात किलो पर्यंत असावी अशा स्पष्ट सुचनाही दिल्या होत्याच. ज्यांना नेहमी लागणारी औषधे,इंजेक्शन कॅरी करावयाचे असेल त्यांनी सरकारी डाॅक्टरानी प्रमाणीत केलेले प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्यक होते. 

आमच्या सत्तावीस जणांच्या ग्रुपपैकी बहुतांशी टुरिस्ट सदस्य अनेक वेळा प्रवास केलेले अनुभवी दिसले. त्यातच भगिनींची संख्या अधिकच लक्षणीय होती. काही फॅमिलीमुळे यंगस्टरही सहभागी झाले होतेच. क्वचितच एखादा नवखा, प्रथमच प्रवास करणारा असावा हे त्याच्या देहबोलीतून समजून येत होते. विमानतळावर निरोप देणारे, बरेचजण कार घेऊन सोडायला आलेले होते.  सुचनांची देवाणघेवाण दोन्हीकडून सुरूच होती. कोलंबो एअरवेजच्या काऊंटरवर ग्रुप लिडर सतत टूरीस्टची संख्या त्याच्या हातातील यादी प्रमाणे तपासून घेत होता. तसे मागे पुढे पांच दहा मिनीटे होणारच हे गृहित धरून होता. अखेर शेवटचा शिलेदार आल्यावर त्यांने खिशातील हात रूमाल काढून समाधानाने तो तोंडावरून फिरवला. साईनाथ बरडे हे आमचे ग्रुप लिडर होते त्यांनी आम्हांस वीणा वर्ल्डचे टॅग बॅगाना लावण्यास दिल्यानंतर आम्ही चेक इन काऊंटरवर संथ गतीने सरकत होतो एकदाचे चेक इन झाल्यावर तेथून हँडबॅग घेऊन स्रिनिंग तपासणी पुर्ण झाली. त्यापुढे पुन्हा मोठी रांगेत उभे राहून आमचे बायोमेट्रिक तपासणी इम्रीगेशन फाॅरमालिटीज पुर्ण करुन विमानतळावरील बग्घीने आम्हांस कोलंबो एअरवेज पर्यंत सोडले. बोर्डिंग गेटपर्यंत येण्यास दोन तास लागले. काहीनी त्या गडबडीतही फोटो काढून नातेवाईकांना लाईव्ह मुव्हमेंट पोस्ट केली.

आम्ही कोलंबो एअरवेजनी बरोबर रात्रौ 8.40 वाजता निघालो होतो. साहाजिकच आमुचा पहिला ब्रेक कोलंबोत झाला होता. कोलंबोत मी यापूर्वीच अलिकडेच दोनवेळा भेट दिली असल्याने तो एअर पोर्ट चांगलाच परिचित झाला होता. त्यामुळे मागील भेटीतील अनेक आठवणी जागृत झाल्या. मी स्वतःच स्मरणरंजनात दंग होऊन गेलो होतो. अल्पावधीतीच्या कोलंबो एअरपोर्टच्या ब्रेकनंतर आमचे विमान मेलर्बन साठी आकाशात झेपावले. आणि मेलबर्न शहराच्या धरतीवर आमच्या चरणकमळांचा स्पर्श 21 ऑक्टोबर 2024 रोजी झाला. ऑस्ट्रेलियातील टाईम टेबल प्रमाणे सांयकाळी 5 वाजून 30 मिनीटांनी झाले होते. मी भेटी दिलेल्या देशात आणखीन ऑस्ट्रेलियाची भर पडली होती. ऑस्ट्रेलियात भेट देण्याचे स्वप्न पूर्ण झाले होते.

त्यानंतर आमचे विमानतळावरील सर्व ग्रुपचे चेकआऊट इम्रीगेशन फार्म भरणे, सोबत आणलेल्या वस्तुचे डिक्लेअरेशन पुर्ण करुन अत्यावश्यक ते सोपस्कार पूर्ण करून झाल्यावर आम्ही आमच्या हाॅटेल मध्ये वीणा वर्ल्डच्या कोच मध्ये बसून आमच्यासाठी बुक केलेल्या हाॅटेल मॅकवूर मध्ये रितसर इन केले. हे तारांकित हाॅटेल मेलबर्न एअरपोर्ट वरून साधारणता चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर होते.

सर्वत्र हिरवीगार गवत लाँन असलेली मैदाने, त्याचबरोबर हिरव्याकंच वृक्षराजीने नटलेल्या मैदानावर अनेकजण कोणी रनिंगचा सराव करत होते तर कोणी अन्य खेळाची प्रॅक्टीस करत होते. घाम गाळीत होते. वाॅक घेत होते. हीच तरूणाई ऑस्ट्रेलियन देशासाठी विवीध खेळातून नांव मिळवित आहेत.  रस्तेही किती शानदार स्वच्छ, खड्डेविरहीत दुर्फता फलाफुलांनी सजलेले होते. काही ठिकाणी या वृक्षवेली॔ना सेंद्रिय खत घालण्याची प्रक्रिया पध्दतीनुसार सुरू होती. नजरेनेच हा नजारा मी टिपून घेत होतो. हाॅटेलच्या खिडकीतून दूरवर नजरेच्या टप्प्यात मध्ये ऑस्ट्रेलियाची शान असलेले 160 वर्षाचे सुप्रसिद्ध ऐतिहासिक मेलबर्न किक्रेट असोसिएशनचे स्टेडियम दिसत होते. ते पाहून मी फारच आनंदित झालो होतो. त्या स्टेडियमचा दिमाख काही औरच वाटत होता. या स्टेडियमला भेट देण्यास माझ्यासारखेच इतरही इच्छूक होतेच. अर्थात आमच्या प्रेक्षणीय स्थळांमध्ये त्याचा समावेश आहेच. रात्रीच्या मुक्कामात झोपी जाण्यापूर्वी मी प्रवासाच्या या गडबडीतही खूप दमून गेलो होतो तरीही माझी डायरी अपडेट करुन घेतली आणिआजच्या आवश्यक त्या नोंदी करून शांतपणे झोपी गेलो.