कांगारूंच्या देशात : डॉ भास्कर धाटावकर यांच्या लेखणीतून सफर ऑस्ट्रेलियाची – भाग 3

आज आमच्या वीणा वर्ल्ड ग्रुपच्या काहीचे एकदोन नातेवाईक भेटावयास आले होते. ते गेली अनेक वर्ष ऑस्ट्रेलियात वास्तव्य करून असल्याने त्यांना ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व मिळाले आहे. पण अजूनही त्यांच्या मुबंई स्पिरीट जागृत होता. त्यांच्याशी माझा गप्पांचा फड चांगलाच रंगून आला होता.

सकाळीच आम्ही हेवी ब्रेकफास्ट करुन अगदी उत्साहाने सस्मित चेहर्‍यांनी सर्वजण तयार झाले होते. अजूनही काही सहकारी यावयाचे होते. उशीरानेच येणाऱ्याचे आम्ही टाळ्या वाजवून स्वागत करीत होतो. ग्रुप लिडरने कितीही वेळेवर येण्याची आर्जवे केली तरी असे होत होते. त्यात सिनीअर सिटीजन असल्यामुळेच थोडे क्षम्यही होते.

तोपर्यंत माझे ऑस्ट्रेलियातील विमान वाहतूक व्यवस्थेबाबत आमची चर्चा चालू होती. नवीन माहिती मिळत होती. त्यातून माहिती मिळाली ती अशी कि आज वेगवान वाहतूक ही व्यवस्था ही काळाची गरज आहे आणि त्याची पुर्तता करण्यासाठी ऑस्ट्रेलियात अनेक अत्याधुनिक सुसज्ज एअरपोर्ट आहेत. ते कार्यान्वित असल्यामुळेच देशांतर्गत आणि
आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी महत्वपूर्ण भूमिका पार पाडीत आहेत.

तोच आजच्या घडीला पर्यटनाचा मानबिंदू आणि केंद्रबिंदू ठरत आहे. सिडनी, मेलबर्न, ब्रिस्बेनसह अन्य ठिकाणांहून लाखो प्रवासी या सेवेचा फायदा घेऊन अशा सुसज्ज विमानतळावरून दररोज गतीमान यातायात करीत आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे वेळेची बचत होत आहे. आजच्या जमान्यात वेळेला फार फार महत्त्व प्राप्त झाले आहे.

येथील ऑस्ट्रेलियन नागरिकांना तुम्ही गुडमॉर्निंग म्हटल्यावर त्यांना आनंद होतो.मग आपणांसही कोणी त्याला तसाच प्रतिसाद मिळतो. यात आपला काहीच तोटा होत नाही झाला तर नफाच होतो. जगात जेव्हा एकमेकाची भाषा समजत नव्हती तेव्हा अतिप्राचीन कालापासून चालत आलेली आणि प्रचलित असलेली एकमेव अशी स्मिताची भाषा दोघांनाही आश्वस्त करीत होती. समोरच्या अनोळखी व्यक्तीविषयी भिती वाटत नाही. हि किमया एका स्मितहास्यात आहे.

आता आमच्या ग्रुप मधील सर्व सदस्य आले होते. काहीचे नातेवाईक भेटावयास आले होते त्यांनी निरोप घेतल्यावर आमच्या रंगलेल्या गप्पा खंडित झाल्या होत्या. पण अनाहूतपणे केलेल्या वार्तालापातून बरेच ज्ञानाचे कण वेचता आले. साध्याच गोष्टी परंतु त्यांची मांडणी छान केली होती.

आमच्या ग्रुप लिडरनी आम्हास नेहमीच्याच पध्दतीनुसार आवश्यक त्या सुचनांची पुनराउक्ती केली आणि आम्ही कोचमध्ये आपआपल्या बुकींग प्रमाणे मिळालेल्या सिट नबंरावर स्थानापन्न झालो. वीणा वर्ल्डच्या प्रथेनुसार प्रार्थना झाली आणि बस मार्गस्थ झाली.

आज आम्ही जगातील अनेक सर्वात सुंदर अशापैकी एक असलेल्या सुप्रसिद्ध नैसर्गिक सौंदर्याचे वरदान लाभलेल्या आणि अत्यंत दक्षतेने काळजीपूर्वक निगा राखलेल्या ग्रेट ओशन रोडवरून लाँग ड्राईव्ह करणार होतो. या ड्राईव्हमध्ये आम्ही एकूण बारा अतिशय प्रेक्षणीय अशा स्थळांना भेटी दिल्या. त्यात प्रामुख्याने Apostles, Shipwreck Coast, and Port Campbell National Park, याठिकाणी हेलीकॉप्टर राईडची सोय उपलब्ध होती. फक्त त्यासाठी जास्तीचे पेमेन्ट अगोदरच केले होते. हा इव्हेंट फार महत्त्वाचा होता. मात्र ही हेलीकॉप्टर राईड आकाशातून स्वच्छ स्फटिका निळ्याशार दिसणार्‍या नितळ सागराचे निरिक्षण करणे हा संस्मरणीय अनुभव होता. ती एक वेगळीच अविस्मरणीय अनुभूती होती. अशा अनेक इनक्रेडीबल लाईमस्टोन स्टॅकस आणि बरेच काही आज
पहायला मिळाले. एकमेकांत मिसळून गेल्याने नेहमीच्याच चिंता, समस्या, त्याच त्या कायम सतावणारे प्रश्न विसरून गेलो होतो. हा आनंद शब्दातीत होता.

खरेतर या लाँग राईडची सुरुवात होताच
यामध्ये एकमेकांचा परिचय करून देण्याची पद्धत असते. कारण काही दिवस तुम्ही एकत्र राहाणार असता आणि साहाजिकच आपल्या सोबतचे सहप्रवासी कोणकोणत्या क्षेत्रातील आहेत हे जाणून घेण्याची उत्कंटाही असतेच. मग प्रत्येकाकडे माईक दिला जातो आणि मग आपण स्वतःची ओळख करुन देत असतो. आज त्याप्रमाणे ही ओळख परेड संपन्न झाली.

मी पुराभिलेखागारातून संचालक पदावरून 30 जून 2011 निवृत्त झाल्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठात पी.एच.डी चा मार्गदर्शक म्हणून काम करीत आहे. आणि साहित्यिक क्षेत्रात ऐतिहासिक दस्तावेजांतून शिवचरित्रातील कल्पना आणि वास्तव यांच्या सीमारेषेवर, छत्रपती संभाजीमहाराज, सरखेल कान्होजी आंग्रे, शासकीय पुराभिलेखागारांची निर्मीती आणि कार्य, रायगड जिल्ह्यातील बेनेइस्रायली समाज आणि इस्रायल इत्यादी इतिहासावरील पुस्तकां बरोबर कथासंग्रह, प्रवासवर्णन, कादंबर्‍या‍चे एकूण तीस पुस्तकांचे लेखन केल्याची माहिती दिली. तसेच निवृत्तीनंतर माझ्या जन्मगावी रामराजला फार्महाऊसची निर्मिती करून तेथे हाॅली डे होम चालवत असल्याचे सांगितले. तेव्हापासून माझ्याबरोबरचे सहप्रवासी आस्थापुर्वक विचारपूस ,चर्चा करू लागले होते.

वीणा वर्ल्ड मधून परदेशातील भारतीय रेस्टॉरंट मध्येच भोजन व्यवस्था करीत असतात त्यामुळे ब्रेकफास्ट, लंच, डिनर याचा मनपसंत आस्वाद घेता येतो. तीच सोय चहा, काॅफीपानाची असते. एकूण वातावरण खेळीमेळीचे असते. जेव्हा लाँग ड्राईव्ह असते तेव्हा कोणी गाणी गातात, कोणी चुटकुले सांगतात. अंताक्षरी हा तर नेहमीचाच फंडा.आमच्या सत्तावीस जणांच्या ग्रुपमध्ये बरेच डाॅक्टर , व्यापारी, प्राध्यापक, यंगस्टर्स, एक चेंबूर येथील सरदारजी आणि कुटुंबिय, शासकीय सेवेतून निवृत्त झालेले असे बहुतेक सिनीअर सिटीजनच आहेत.

काहीजण दिल्लीहून, बंगलोर, बडोदरा गोव्यातूनही आले होते. या सर्वाशी पहिल्याच दिवसापासून आमचा चांगलाच दोस्ताना जमून गेला. टूर मध्ये प्रत्येकजण दुसर्‍या सदस्यांबरोबर सौजन्यशील असतो.

या मध्ये कोल्हापूरचे डाॅक्टर अंभ्यकर हे इतिहासप्रेमी निघाले. त्यांचे वाचनही खूप सखोल आणि दांडगे होते. त्यांच्या मिसेसही डाॅक्टर. त्यासुध्दा गप्पात सहभागी झाल्या होत्या. आजच्या लाँग ड्राईव्हमध्ये प्रवास करताना मला कोकणातूनच आपण प्रवास करीत आहोत असेच वाटत होते. इतकी आमची कोकणभूमी सुंदर आहे.
मला शाळेतील कविता आठवली…..

“कोकण दरिद्री बोलते कोण?
छे,छे ती सोन्याची सुंदर खाण!
अत्यंत घनदाट वृक्षराजी,
दुसरीकडे फेसाळणारे अथांग महासागर,
त्यात सागरी जलक्रिडा करणारे,
जीवनाचा स्वच्छंद आनंद घेणारे,
असंख्य उत्फुल्ल तरूणाई,
डोळ्याचे पारणे फेडीत होते.”

आजचे मुख्य आकर्षण होते एम.सी. किक्रेटच्या जगातले सर्वात मोठे, अत्याधुनिक सोयी सुविधा असलेले 158 वर्षाचा इतिहास असलेले मैदानात आत जाऊन तेथील ऑफीशियल गाईड मार्फत तेथील सर्वच प्रदर्शनीय भाग पहावयाचे होते. त्याची उत्कंटा खूप लागून राहिली होती. तेथे ऐतिहासिक घटनांचे साक्ष असलेले ज्यांनी किक्रेट जगतात आपली अजरामर छाप पाडली आहे प्रसंगानुरूप वस्तुंची, फोटोग्राफची, स्मृतिचिन्हाची, काही वृतपत्रातील ऐतिहासिक कागदपत्राची पाहाणी करणेही महत्वपूर्ण होते.