कांगारूंच्या देशात: डॉ भास्कर धाटावकर यांच्या लेखणीतून सफर ऑस्ट्रेलियाची – भाग १

मित्रहो!

नमस्कार! बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर परत एकदा आम्ही घेवून आलो आहोत डॉ भास्कर धाटावकर यांच्या जागतिक विश्व भ्रमंती मधील नवीन अध्याय. या अगोदर आपण सफर कॅनडाची तसेच सफर अमेरिकेची ही मालिका अनुभवली होती. या दोन्हीं लेख मालिकेला वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. या नंतरचा पुढचा टप्पा म्हणजे ऑस्ट्रेलिया. आम्हीं घेवून आलो आहोत डॉ भास्कर धाटावकर यांच्या लेखणीतून “कांगारूंच्या देशातून – सफर ऑस्ट्रेलियाची” हि लेख मालिका.

ऑस्ट्रेलिया पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील एक खंड असून आता तो देश म्हणूनही प्रस्थापित झालेला आहे. ऑस्ट्रेलिया खंडात टास्मानिया बेट व हिंदी महासागर व पॅसिफिक महासागरातील अनेक बेटांचा एकत्रित समावेश झालेला आहे . ऑस्ट्रेलियाचा असा विलक्षण इतिहास आहे. येथे ज्या लोकांनी या देशाच्या जडण घडणीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग दिला आणि घटना दिली,आकार देऊन पारंपरिक अविस्मरणीय उत्सव, संग्रहालयांची निर्मिती, दर्जेदार शिक्षणाची पायाभरणी, आणि ऑस्टेलियन राष्ट्रीय संस्कृतीचा अमिट ठसा उमटवून सांस्कृतिक धोणात्मक भरीव कामगिरी केली आहे. या सर्वाचा फारच मनोरंजक असा इतिहास आपणांस पहावयास मिळतो.

ऑस्ट्रेलियाचा इतिहास हा काॅमनवेल्थ मध्ये समावेश असलेल्या सर्वच भूमी आणि तेथील लोकांचा इतिहास आहे. 1 जानेवारी 1901 या दिवशी ब्रिटिश वसाहतीचे महासंघ म्हणून आधुनिक नवीन राष्ट्र जगाच्या नकाशावर अस्तित्वात आले.ऑस्ट्रेलियाच्या निर्मीतीचा इतिहास तसा फारच प्राचीन काळापासूनचा आहे. त्याची अनेक स्थित्यंतरे सांगता येतील.
ऑस्ट्रेलियाच्या प्रागेतिहासिक काळाविषयी अद्यापही फारशी माहिती उपलब्ध नाही. साऊथ ऑस्ट्रेलियातील आयर्न माॅनर्क व आयर्न बॅरन या साठ्यातून मोठ्या प्रमाणावर लोखंडाचे उत्पन्न घेण्यास सुरुवात केली होती.

ऑस्ट्रेलियाचा शोध 1770 मध्ये जेम्स कुक या साहसी दर्यावर्दीने आपल्या स्वतःच्या मालकीच्या जहाजातून भ्रमण करून पुर्व तटीच्या किनार्‍याचा अभ्यासपुर्ण नकाशा तयार केला. आणि या नवीन शोधलेल्या प्रदेशाला न्यू साऊथ वेल्स नाव देऊन हा प्रदेश ग्रेट ब्रिटनचा भाग असल्याचे जाहीरही करून टाकले. साहजिकच ब्रिटिश साम्राज्य मध्ये आणखीन एका वसाहतीची भर पडली.

या ऑस्ट्रेलियात सोन्याच्या खाणीचा लागलेला शोध आणि कृषीविषयक उद्योगासाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेली जमीन व तितकाच पाणी पुरवठा या प्रमुख कारणास्तव एकोणीसव्या शतकात ब्रिटनमधील अनेक लोकांचे लोंढे येथे मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाले. त्यांनी अधिकाधिक जमीनीचा कब्जाकरून कृषिप्रधान संस्कृतीची भक्कम पायाभरणी केली. तेव्हापासून ऑस्ट्रेलिया वाढतच गेली.

जगातील सर्वच खंडातील सोन्याच्या खाणीचा लागलेला शोध आणि त्यावर आपलेच वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आतोनात झालेली युध्दे. या मानवी संघर्षातून झालेली जिवीत हानी खूपच मोठ्या संख्येत होती. शेवटी या सोन्याच्या खाणीवर स्वामित्व मिळाल्यावर खोदकामासाठी निरनिराळ्या देशातून केलेली गुलामांची आवक या साऱ्यांचा रक्तरंजीत इतिहास हा वेगळाच संशोधनाचा विषय होईल.

तर या सोन्याच्या हव्यासापोटीही ऑस्ट्रेलियात येऊन आपले नशीब अजमावून पहावे याभावनेतून अनेक साहसी लोकांचे आकर्षण वाढल्याने त्यांनी येथे येण्यासाठी अनेकांनी धाव घेतली. मग याच्यातूनही जुने विरुध्द असाही संघर्ष होत राहिला. हळू हळू या ब्रिटिश अधिपत्यातून आलेल्यानी आपलीही एक स्वतंत्र व्यवस्था असावी या विचारधारेनी जोर धरला होता.

यातूनच ब्रिटनमधील स्थलांतरिताने पुढाकार घेऊन स्वायत्त संसदीय लोकशाही प्रणाली स्थापन करण्याचा विचार विनिमय सुरू केला आणि त्याला मूर्त स्वरूप 1901 जनमत अजमवण्यासाठी मतदान घेण्यात आले आणि त्यातूनच ऑस्ट्रेलिया जगाच्या नकाशावर विराजमान झाले.

माझ्यात किक्रेटची आवड निर्माण झाल्यापासून आणि थोडेफार ते समजू लागल्यापासून ऑस्ट्रेलिया विषयी विशेष ओढ होती. सर ब्रॅडमनच्या झंझावाताची बरीचशी माहिती झाली होती. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा जागतिक दबदबा हा कौतुकाचा विषय होता. आजही ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ आपली विजूगाषी वृती कायम राखून आहे.

ऑस्ट्रेलियातील खेळ संस्कृतीचे एक वैशिष्ट्ये मला वाचनातून लक्षात आले आणि मग त्या संदर्भातील अधिकाधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करीत राहिलो. मुळात ऑस्ट्रेलियन संस्कृती ही प्रामुख्याने पाश्चात्य वंशावर आधारित आहे. ब्रिटिशांच्या खेळ संस्कृतीचा फार मोठा प्रभाव पडलेला आहे आणि ते नैसर्गिक असून हे आजचे ऑस्ट्रेलियन ब्रिटिश मुळनिवासी आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. ऑस्ट्रेलियाचा अनोखा भुगोल आणि स्थलांतरित पण आता तेथे स्थानिक झालेल्या लोकांचा ऑस्ट्रेलियाच्या जडणघडणीत फार फार मोठे योगदान आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.

खेळातील यश अपयश या नाण्यांच्या दोन बाजू असून जिंकण्याची इर्शा व जिद्द खेळाडूंना प्रोत्साहीत करीत असते. यातूनच जागतिक स्तरावर एक वेगळीच ओळख निर्माण करण्यास सक्षम करते. विजयी खेळाडू हे राष्ट्रीय हिरो बनतात. लोकांच्या गळ्यातील ताईत होतात. लोक प्रेमाने त्यांना आपले मानतात. अशाच दिग्गज खेळाडू पैकी किक्रेटपट्टू सर डोनाल्ड ब्रॅडमन याचे उत्तम उदाहरण देता येईल. आज ते ऑस्ट्रेलियन क्रिकेटचेच नव्हेतर किक्रेट विश्वाचे आयकॉन झाले आहेत.

किक्रेट आणि माझे भावनिक नाते जोडले गेले आहे. अलिबागच्या जे.एस. एम काॅलेज, पुढे स.प.महाविद्यालय, पुणे आणि पुणे विद्यापीठ संघातून मी खेळलो आहे. भरपूर आनंद मी या खेळातून घेतला आहे. येथे अलिबागचे सुपुत्र किक्रेटपटू उमेश कुलकर्णी यांची एक आठवण नमूद करीत आहे. उमेशची भारतीय क्रिकेट संघात मध्यमगती तेज गोलंदाज म्हणून निवड झाली होती आणि आपला संघ ऑस्ट्रेलियात कसोटी सामने खेळण्यास गेला होता. उमेश पहिल्याच कसोटीत खेळत होता. तेव्हा आजच्या सारखे दूरदर्शनवर मॅचेस पाहाता येत नसत. वृतपत्रातील वृतांत आणि कोणाच्या तरी रेडिओवरील काॅमेंट्री हाच एक मार्ग होता.
तर पहिल्याच कसोटीत खेळणारा उमेश कुलकर्णी हा अलिबागकरांच्या अभिमानाचा विषय झाला होता.

या उमेश कुलकर्णीने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार बील लाॅरीचा पहिल्याच चेंडूवर उडवलेला त्रिफला ही समस्त अलिबागकरांना प्रचंड आनंद देऊन गेली होती. तेव्हा बालाजी मंदिर चौकातील वीरकराच्या छोटेखानी दुकानात रेडिओवर काॅमेंट्री चालू होती. ऐकणार्‍यात काॅमेंट्री समजणारे व न समजणारे दोन्ही गुप्र उभे असत. तेव्हा जाणकरांनी जोरजोरात ओरडत सांगितले आपल्या उमेशनी लाॅरीला आऊट केला. मग काय एकच जल्लोष! कुणीतरी फुलांचा हार आणून रेडिओला घातला. अवघा आनंदी आनंद चोहोकडे पसरला होता. तो क्षण अजूनही माझ्या स्मरणात आहे.

तेव्हापासून या कांगारूच्या देशात भेट देण्याची सूप्त इच्छा अनेक वर्ष मनात रेंगाळत होतीच. तसे आजपर्यंत मी चाळीसएक विवीध देशाना भेटी दिल्या आहेत, मात्र गेली तीन वर्ष प्रकृती स्वास्थ्य ठिक नसल्याने माझी भटकंती स्थगित झाली होती पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात माझी मिसेस उषाने पुढाकार घेतल्याने मी सुध्दा या ट्रीप मध्ये सहभागी झालो.

Mr and Mrs Dr Bhaskar Dhatavkar
Mr and Mrs Dr Bhaskar Dhatavkar

मी इतिहासाचा विद्यार्थी असल्याने ज्या देशात जायचे त्या देशाचा इतिहास, भौगोलिक सीमा,त्यांचे आंतरराष्ट्रीय संबंध इत्यादी विषयक माहिती वाचून आवश्यक ते टिपण काढून ठेवतो. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ आणि आपण किक्रेट प्रेमी भारतीय यांच्यात एक वेगळेच स्नेह संबंध, नाते आहे. तरीही जेव्हढे हाती लागले ते वाचीत गेलो. आता 20 ऑक्टोबर मध्ये प्रत्यक्ष प्रस्थान ठरले आहे. तरी मी पाहिलेल्या कांगारूचा देशाची माहिती तुमच्या पर्यंत पोचवण्या करिता हा लेखन प्रपंच करीत आहे.

Dr Bhaskar Dhatavkar
Dr Bhaskar Dhatavkar in Australia