कांगारूंच्या देशात: डॉ भास्कर धाटावकर यांच्या लेखणीतून सफर ऑस्ट्रेलियाची – भाग 6

आज ऑस्ट्रेलियाची आन बाण शान असलेल्या सिडनीत सैर करावयाची होती. सर्वच मंडळीने सकाळचा ब्रेकफास्ट आटोपून तृप्तीचे ढेकर दिले होते. समस्त विणा वर्ल्डचे टुरिस्ट पुढील प्रस्थान साठी सज्ज झाले होते. आघाडीवरील बिगुलचा ध्वनी कानी पडताच सर्वजण आपआपल्या जागेवर आज्ञाधारक बालकासारखे बसून गेले आणि आजच्या साईटसिंगचा प्रवास सुरू झाला.

आजच्या गप्पाचा ओघ ऑस्ट्रेलियातील नाईट लाईफ याविषयावर सुरू झाला आणि त्यामध्ये काहीनी उस्फूर्त भाग घेऊन चर्चेत सहभागी झाले. नाईट लाईफ ही आजच्या माॅर्डन शैलीचा अविभाज्य भाग झालेला आहे.

मनोरंजनाची समुदायाकडून त्यांच्या आवडी निवडीनुसार केलेली फर्माईश आणि त्याची केली जाणारी पुर्तता असे ढोबलमानाने बोलता येईल. जी संध्याकाळपासून सुरू होऊन पहाटे पर्यंत उपलब्ध असते.

In sydney at night

आता ही संकल्पना सर्वत्र लोकप्रिय होत आहे आणि तरूणाई या प्रकारात आकर्षित होत असतात. यामध्ये पबचा समावेश असून त्याबरोबर बार, नाईट क्लबमधील साग्रसंगीत पार्ट्या, लाईव्ह म्युझिक , खास आयोजित केलेले काॅन्सर्ट, कंबरेत,थिएटर, सिनेमा अशा अनेक गोष्टींची रात्रभर अ‍ॅक्टिव्हीटीज चालू असतात. याचे अर्थकारण जबरदस्त असते.

ऑस्ट्रेलियातील नाईट लाईफ बाबत सांगायचे झाल्यास, ऑस्ट्रेलियन लवकर उठतात आणि उशीराने घराबाहेर पडत नाहीत. ते त्या॔चा रात्रीचा वेळ जास्तीत जास्त बाहेर काढत आहेत असे होत नाही तर वाजवी वेळेत घरी परतण्यावर त्यांचा कल असतो असे दिसून आले आहे. मात्र हे नाईट लाईफ केवळ ऑस्ट्रेलियन साठीच नसून येथे भेट देणाऱ्या असंख्य पर्यटकांसाठी आहे. जशी मागणी तसा पुरवठा या नियमानुसार यांची सेवा सुरू असते.

ऑस्ट्रेलियातील सिडनी, मेलबर्न, ब्रिस्बेनसह अन्य प्रमुख शहरातून जास्तीत जास्त बेस्ट सेवा देण्याची अलिखित स्पर्धाच दिसून येते असे निरिक्षण नोंदविण्यात आलेले आहे. लोकांच्या आवडी निवडीनुसार अशाप्रकारची सेवा देण्यात अनेक देशात ही अगदीच सर्व सामान्य बाब ठरत आहे.

आमच्या आयटनरीचे ठिकाण नजदिक आल्याचे ग्रुप लिडर आणि गाईडनी उद्घोषीत केल्यावर आमची रंगलेली मैफिल संपुष्टात आली.

Blue Mountain Sydney

आज सिडनीतील सर्वाधिक लांबीचा लांबलचक कोस्ट आणि ब्लू माऊंटन व तस्मान सागर यांना जोडणाऱ्या सुदंर रोडवरून ड्राईव्ह होते. हा ड्राईव्ह येथे फारच लोकप्रिय झाला आहे. त्याला जोडूनच ग्रँड पॅसिफिक ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होतेच. अशा एक ना अनेक प्रकारचा भरगच्च कार्यक्रम होताच. भगिनीं वर्गाकडून शाॅपिंगची मागणी जोरात होती. सोबत आणलेले अमेरिकन डॉलर तसेच परत न्यायचे म्हणजे काय ? हा रास्त प्रश्न त्यांच्यापुढे होताच.

जेर्वीस बीचवरील सफेद रंगाची वाळू, स्फटिका सारखे निळेशार स्वच्छ पाणी सारे आपणांस मंत्रमुग्ध करते. हा परिसर अत्यंत सुंदर, निसर्गरम्य, जगातील सर्वच पर्यटकांना आकर्षित करीत असतो. आम्हीही येथै खूप धमाल मस्ती केली. कुठेतरी असे मोकळेपणाने श्वास घेऊन व्यक्त होणे आवश्यक होतेच. अनोळखी व्यक्तीजवळही तुम्ही मनांतले किल्मिष, दु:ख सहज सांगून मनं हलके करू शकता.

Dolphin

जाता जाता डॉल्फिनची अदाकारी ती मस्तीभरी उत्फुल्ल अदाकारी क्रूझवरून आम्हांस अनुभवता आली आणि आनंदाचा एकच चित्कार क्रूझवरून उमटला. या अथांग सागरी भागात डॉल्फिनाचे अधिकाधिक वास्तव्य आहे असे गाईडने सांगितले.

येथे प्रचंड जनसागर उसळला होता. सर्वच वयोगटातील स्त्रि, पुरुष, लहान मुले त्याचबरोबर विक्रेते, हौशे, नवशेही मोठ्या प्रमाणात होते. मला तर गावाकडील जत्रेची आठवण येत होती. त्यानंतर शाॅपिंग साठी वेळ देण्यात आला. येथे एक बरे होते डिनरचे हाॅटेल जवळच होते. त्यामुळे आज काहीना श्रमपरिहार करण्यास अधिकचा वेळ मिळाला.

भगिनींकडून मनपसंत शाॅपिंग झाली. आज फारशी घाई कोणीच करीत नव्हते कारण कालच्याच हाॅटेल मध्ये आजही मुक्काम होता.

माझ्या मनात सतत एक विचार येत होता तो असा कि, आपल्याच आपल्याकडील रेवस ते रेड्डी हा महत्वकांक्षी सागरी महामार्ग निर्माण झाल्यास अशीच अनेक देशातील पर्यटकांची गर्दी होणार नाही काय? आपण फक्त घोषणांचा पाऊस पाडतो. निसर्गाने आपल्या कोकणात भरभरून सौंदर्य दिले आहे पण आपण त्याचा पुर्ण क्षमतेने आणि कल्पकतेने वापरच केलेला नाही. संपूर्ण कोकण पट्टीत अलिबाग मधील अष्टागारे, श्रीवर्धन, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्ये अशी अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. पण तिकडे पर्यटनाच्या हृषीकोनातून लक्ष देण्यास आम्हांस वेळच मिळत नसावा.