
कोल्हापूर: मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात निर्माण झालेली पूरस्थिती गंभीर बनली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोल्हापुरात सगळीकडे पानीच पानी पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील १०७ बंधारे पाण्याखाली गेले असून पंचगंगा नदीची पातळी ५० फूट ९ इंच इतकी पोहोचली आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला असून पाणी उपसा केंद्रातही पाणी शिरल्याने कोल्हापूर शहर आणि उपनगरांचा पाणी पुरवठा बंद झाला आहे.
इचलकरंजी येथे पुरातून मानवी वस्तीत आलेली मगर एनडीआरएफच्या जवानांनी पकडली. अचानक मगर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पुराच्या पाण्यासह साप आणि मगरींचाही धोका वाढला आहे.
कोल्हापूर शहराजवळून जाणाऱ्या पुणे-बंगळुरू महामार्गावरही पुराचे पाणी आल्याने वाहतूक पूर्वेकडील बाजूने सुरू ठेवण्यात आली आहे. पुण्याहून कोल्हापूर-बेळगाव आणि बंगळुरूकडे जाणाऱ्या वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. या बरोबरत गारगोटी-गडहिंग्लज मार्गावरील पांगिरे फाट्याजवळील पूलही कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
महापुराच्या तडाख्याने पिण्याच्या पाण्याची प्रचंड टंचाई; शहराला पाणीपुरवठा करणारे तिन्ही उपसा केंद्रे पुरात बुडाल्याने महापालिकेची संपूर्ण यंत्रणाच कोलमडली.






