
मुंबई: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. ईडी कडून महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळा प्रकरणी अजित पवार यांच्या बरोबर शरद पवार यांच्या विरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सूत्राकडून समजते. दरम्यान शरद पवारांनी याबाबत आपले नाव नाही तसेच बँकेने सांगितल्या प्रमाणे माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार, अजित पवार यांच्यासह एकूण 70 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यात सर्वं पक्षीय राजकारण्याचं समावेश आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीपराव देशमुख, ईश्वरलाल जैन, जयंत पाटील, शिवाजीराव नलावडे, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, राजेंद्र शिंगणे आणि मदन पाटील यांच्यासह महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे चेअरमनसह ७० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
घोटाळा २५ हजार कोटींचा असल्याचं ईडीने म्हटलं आहे. सहकारी बँकेचे आर्थिक स्थितीत कमकुवत असतानाही सहकारी साखर कारखान्यांना कर्ज मंजूर करण्यात आलं. कर्ज वाटप करताना मोठ्या प्रमाणावर अनियमितता होती, असा ठपका ईडीने ठेवला आहे. तसेच सहकारी साखर कारखाने आजारी पडल्यानंतर चुकीच्या पद्धतीने फायदा घेण्यासाठी अतिशय कमी किमतीत विकली गेल्याचं ईडीने म्हटलं आहे. सहकारी साखर कारखाने काही विशिष्ट राजकारण्यांच्या जवळच्या नातेवाईकांना विकल्या गेल्याचा दावाही ईडीने केला आहे.
याप्रकरणी चौकशी समिती देखील नेमण्यात आलेली होती. चौकशी समितीने अहवाल सादर केल्यानंतर अखेर कोर्टाने याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर आता तब्बल ३१ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले होते. अजित पवार यांच्यासह विजयसिंह मोहिते पाटील आणि शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आले होते.






