भाजपाची पहिली यादी जाहीर; 52 विद्यमान आमदारांची यादीत नावे

मुंबई : भाजपानं 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस दक्षिण-पश्चिम नागपूरमधून निवडणूक लढणार असून, चंद्रकांत पाटीलपुण्यातील कोथरूडमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर परळीतून पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा सामना पाहायला मिळणार आहे. भाजपानं मुक्ता टिळक यांना कसबा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर अतुल भोसले दक्षिण कराडमधून निवडणूक लढणार आहेत. भाजपाने विद्यमान 11 उमेदवारांच्या आमदारकीचे तिकीट कापले, तसेच ५२ विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे. 

एकनाथ खडसे

दरम्यान भाजपाच्या पहिल्या यादीतून अनेक दिग्गज नावे गायब झालेली पाहायला मिळतात. विशेष म्हणजे भाजपाचे नाथाभाऊ एकनाथ खडसे यांचे नाव ही पहिल्या यादीत नाही तरीही त्यांनी उमेदवारी अर्ज भरला असल्याचे सांगितले जाते. खडसे नाराज असून त्यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केलं आहे. माझ्या उमेदवारीबाबत काय निर्णय होतो ते पाहू. मात्र तुम्ही मला साथ द्याल का? असं आवाहन करत खडसेंनी उमेदवारी अर्जही भरला असून त्यांनी एकप्रकारे बंडाचे संकेतच दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच उभं आयुष्य पक्षासाठी खर्च करणं गुन्हा असेल, तर तो गुन्हा आपण केल्याची खदखद त्यांनी व्यक्त केली आहे. याबाबत एकनाथ खडसे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.