हिंदी – चिनी भाई भाई;भारत आणि चीन यांच्या संबंधातील नवे युग सुरु – पंतप्रधान नरेंद्र मोदी

चेन्नई: चेन्नई कनेक्ट’द्वारे भारत आणि चीन यांच्या संबंधांतील नवे युग सुरू झाले आहे,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मोदी यांनी गेल्या दोन दिवसांत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत विविध सत्रांमध्ये सुमारे साडेपाच तास चर्चा केली. त्यानंतर द्विपक्षीय संबंधांबाबत शनिवारी मोदी यांनी भूमिका व्यक्त केली.

शिष्टमंडळ पातळीवरील चर्चेपूर्वी जिनपिंग आणि मोदी यांनी ‘फिशरमन्स कोव्ह रेसॉर्ट’ येथे तासभर चर्चा केली. यातून दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध बळकट करण्याचा संदेश दिला. समुद्रकिनारी असलेल्या चर्चेच्या ठिकाणी दोन्ही नेते गोल्फ कार्टमध्ये बसून दाखल झाले. दरम्यान, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन्ही देशांतील तिसऱ्या अनौपचारिक चर्चेसाठी पुढील वर्षी चीनला येण्याचे आमंत्रण दिले. मोदी यांनी हे आमंत्रण स्वीकारले आहे.

-द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढण्यासाठी दोन्ही देशांनी नवी उच्चस्तरीय यंत्रणा उभारण्याचे ठरवले आहे.

– प्रस्तावित प्रादेशिक एकात्मिक आर्थिक भागीदारीत (आरसीईपी) भारताच्या चिंतेच्या मुद्दे विचारात घेण्याचे आश्वासन चीनने दिले.

– सीमेवर शांतता राखण्यासाठी सुरक्षा सहकार्य; तसेच परस्पर विश्वास वाढवण्यासाठी उपाययोजना करणार